सातासमुद्रापार गर्जते मराठी संस्कृती, अमेरिकेत झाला ढोलांचा दणदणाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:12 AM2018-09-26T03:12:41+5:302018-09-26T03:13:11+5:30
गणेशोत्सवाचा जागर महाराष्ट्रातच नव्हे तर आता सातासमुद्रापारही होत आहे. भारतीय सणांचे आकर्षण परदेशातील नागरिकांमध्येही प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेतही गणरायासमोर ढोलांचा दणदणाट झाला.
- तुषार सोनवणे
पुणे : गणेशोत्सवाचा जागर महाराष्ट्रातच नव्हे तर आता सातासमुद्रापारही होत आहे. भारतीय सणांचे आकर्षण परदेशातील नागरिकांमध्येही प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेतही गणरायासमोर ढोलांचा दणदणाट झाला.
अमेरिकेतील मिसिगन आणि ओहिओ येथील भारतीय व्यक्ती एकत्र आले आणि त्यांनी गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार ते गणरायाची प्रतिष्ठापना करतात. यंदा गणरायांचे आगमन तिथे झाले आणि त्यांच्यासमोर ढोलांचा दणदणाटही झाला. कारण पुण्यातून अमेरिकेत ढोल नेण्यात आले आहेत. अमेरिकेतील नागरिकांना आता ढोलांचा गरजही ऐकायला मिळत आहे. मिसिगन या ठिकाणी भारतीयांनी एकत्र येवून शिवशार्दुल ढोलताशा पथक स्थापन केले आहे. या पथकाचे उद्दिष्ट म्हणजे एकमेकांमधील नात्यांचे बंध घट्ट करणे होय. तसेच आपली संस्कृती जपणे. अमेरिकन भारतीय तरुण वर्गात आपल्या भारतीय पारंपरिक वाद्यांची गोडी निर्माण व्हावी आणि भारताबाहेर आपली संस्कृती रूजावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
शिवशार्दुलमधील सभासदांनी स्वत:हून पैसे काढून भारतातून वाद्ये तिथे नेली. सुरुवातीला चार ते पाच ढोल आणले होते. नंतर टप्प्याटप्प्याने ढोल आणण्यात आले. सध्या पथकाकडे ३५ ते ४० ढोल आहेत. पण तालमींसाठी मात्र त्यांना बऱ्याच दिव्यातून जावे लागले. ‘ढोल-पथकाची तालीम म्हणजे मोठा आवाज असणारच. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार.
शेवटी तिथे एका पार्कमध्ये वादनाचा सराव करण्याची परवानगी मिळाली. ढोलताशे वाजवणे आणि ते वाजवण्यास शिकवणे हे अवघड काम होते. सुरुवातीला त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती यू-ट्युबवर शिकून त्यानंतर पथकाचा बाकी वादकांना शिकवून पथकाची सुरुवात झाली.
सरावासाठी लहानथोर सहभागी
१ अमेरिकेत थंडीचा हंगाम संपताच पथकाकडून सरावाला सुरुवात केली जाते. शाळकरी मुला-मुलींपासून ते कॉलेजला जाणारे, नोकरी करणारे, महिला अशा वेगवेगळ्या वयांचे सभासद पथकात आहेत.
२ पातीला मेण लावणे, ढोलाच्या दोºया आणणे, फुटलेल्या पातीच्या जागी दुसºया पाती देणे, ढोल ताणणे, ताशा पान आवळणे यावर रीतसर काम करणे आणि सरावाच्या काळात खास लक्ष दिले जाते.
३ वादनाबाबत टिपरू मेणावर बसत नसेल, थापी वाजत नसेल तर वादनाच्या तांत्रिक बाबी शिकवल्या जातात. अनंत केंडळे, कपिल गुटाला, मिलिंद कुलकर्णी, अनुप गोंगले यांनी २०१५ साली पथकाची स्थापना केली. तसेच तुषार देसले, सागर खैरे हे सराव घेतात.