मराठी विभागाला हवा स्वतंत्र संकुलाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:39+5:302020-12-28T04:07:39+5:30
पुणे : राज्यातील विद्यापीठांमधील विभागांचे संकुलात रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विभागाचा समावेश ...
पुणे : राज्यातील विद्यापीठांमधील विभागांचे संकुलात रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विभागाचा समावेश ‘स्कूल आॅफ इंडियन लॅग्वेज’ मध्ये झालेला नाही. त्यामुळे मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाच दर्जा द्यायला हवा. मात्र, मराठी भाषेच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठाकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षित ठेवलेल्या मराठी विभागाला पुन्हा संकुलात बांधून संकुचितच ठेवले जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठातर्फे भारतीय भाषा आणि परदेशी भाषांसाठी ‘स्कूल आॅफ इंडियन लॅग्वेज’ आणि ‘स्कूल आॅफ फॉरेन लॅग्वेज’ असे दोन भाग केले आहेत. मात्र, सोशल सायन्स, केमिकल सायन्स असे विविध ‘संकुल’ तयार केले आहेत. पुणे विद्यापीठाला प्रत्येक वेळी विज्ञान शाखेचे कुलगुरू मिळाले. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विभागांना नहेमी झुकते माप मिळत राहिले,असा आरोप नेहमी केला जातो. त्यामुळेच सध्या विज्ञान शाखेच्या विभागांसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र संकुलांची निर्मिती केली जात असल्याचे बोलले जात आहे.
राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीने राज्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, याबाबत राज्य शासन उदासिन आहे. आता मराठी विभागांना एका चौकटीत बांधून विद्यापीठांकडूनही विभागाच्या कामाच्या मर्यादा कमी केल्या जाणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मराठी विभागाला भाषा, संस्कृती, बोली भाषेच्या व ज्ञान भाषेच्या दृष्टीने अधिक सखोलपणे काम करण्यासाठी अनुकुल वातावरण मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा द्यावा,अशी अपेक्षा भाषा अभ्यासकांकडून केली जात आहे.
--------------------------------------
विद्यापीठातील मराठी विभागांना स्वतंत्रपणे काम करता आले पाहिजे.त्यासाठी विद्यापीठाच्या मराठी विभागाला प्रगत अध्ययन केंद्राचा स्वतंत्र दर्जा द्यायला हवा.
- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती,