मराठी चित्रपट क्षेत्र वलयांकित होण्याची गरज; अभिनेते रितेश देशमुख यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:33 AM2024-01-22T10:33:47+5:302024-01-22T10:34:01+5:30
महाराष्ट्रातील सर्व मोठ्या स्टुडिओंनी एकत्र येऊन वर्षाला १२ मोठे चित्रपट निर्माण केले पाहिजेत
पुणे: ओटीटी मराठी चित्रपट घेत नाहीत. सॅटेलाइट वाहिन्यांवर फार किंमत मिळत नाही. त्यामुळे मराठी चित्रपट क्षेत्र हे वलयांकित (स्टार ड्रीव्हन) झाले पाहिजे. केवळ अभिनेतेच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक आणि त्यातील तंत्रज्ञ यांना वलय मिळाले पाहिजे, मराठी चित्रपट क्षेत्र वलयांकित होण्याची गरज आहे, तरच मराठी चित्रपट चालतील, असे मत अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी व्यक्त केले.
२२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘नव्या मराठी चित्रपटाच्या शोधात’, या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. दिग्दर्शक निखिल महाजन, लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर, अभिनेते निर्माते मंगेश देसाई, लेखक संजय कृष्णाजी पाटील उपस्थित होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना बोलते केले.
देशमुख म्हणाले, की महाराष्ट्राची लोकसंख्या ही मोठी आहे, त्यामुळे मराठी चित्रपट चालायला हरकत नाही. मात्र, ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर चालत नाहीत. त्यासाठी सर्व मोठ्या स्टुडिओंनी एकत्र यायला हवे आणि एकत्रितपणे वर्षाला मोठे १२ चित्रपट निर्माण केले पाहिजेत. दर महिन्या-दीड महिन्याला मोठा चित्रपट आला, तर प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर येतील. मराठी लोक ही चर्चा ऐकून पुढच्या आठवड्यात चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे गाजलेल्या चित्रपटांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या आठवड्यात होतो. याचा चित्रपट निर्मात्यांनी विचार केला पाहिजे. मराठी चित्रपटाचे प्रेक्षक ट्रेनमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे दिग्दर्शक निर्मात्यांनी ट्रेनमध्ये बसले पाहिजे, स्टेशनवर राहून चालणार नाही. निखिल महाजन म्हणाले, की मराठी सिनेमा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पन्नाच्या बाबतीत जायला हवा. पुरस्कार महत्त्वाचे आहेत, पण पुरस्कारापेक्षा चित्रपट चालायला हवेत. वरुण नार्वेकर म्हणाले की, अशा कथा सांगण्याची गरज आहे, की प्रेक्षकांना ज्या ओटीटी आणि छोट्या पडद्यापेक्षा चित्रपटगृहात बघायला आवडतील, तरच प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील.
आपण चित्रपट क्षेत्राकडे कसे वळलो, हे सांगताना रितेश देशमुख म्हणाले, ‘‘की मी अगोदर आर्किटेक्ट झालो आणि अमेरिकेत काम करण्यासाठी गेलो होतो आणि पुढे हेच केले असते; पण मी मला स्वतःचा शोध घेण्यासाठी अमेरिकेत अभिनयाचा कोर्स केला आणि पुढे चित्रपटात आलो. मी आणि जेनेलिया आम्ही एकत्रितपणे ‘जोगवा’ पाहिला आणि नंतर लगेच मराठीमध्ये येण्याचा विचार केला.’’