शुक्रवारी नाट्यगृहामध्ये झळकणार मराठी चित्रपट! पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून शुभारंभ
By श्रीकिशन काळे | Updated: December 19, 2024 15:49 IST2024-12-19T15:47:30+5:302024-12-19T15:49:57+5:30
ज्या नाट्यगृहात नाटक लागलेले नसेल, तिथेच चित्रपटाला वेळ देण्यात येईल, असा हा उपक्रम

शुक्रवारी नाट्यगृहामध्ये झळकणार मराठी चित्रपट! पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून शुभारंभ
पुणे: मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये योग्य जागा मिळत नसल्याने अनेक चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे राज्यामध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. त्याची सुरवात पुण्यातून होत आहे. नाट्यगृहामध्ये चित्रपटाचा खेळ दाखविण्याचा प्रयोग शुक्रवारी (दि.२०) पुण्यात यशवंतराव नाट्यगृहात होत आहे. त्यामुळे ही एक वेगळी नांदी मराठी चित्रपटांसाठी ठरू शकते. याविषयी ‘लोकमत’ने सुरवातीपासून पाठपुरावा केला आहे.
मराठीमध्ये गेल्या काही वर्षांपासून अतिशय चांगले चित्रपट तयार होत आहेत. त्यातून सामाजिक संदेश, भावनिक गुंतागुंत असे अनेक विषय आले. पण काही चित्रपट चांगले असूनही त्यांना मल्टीप्लेक्समध्ये जागाच मिळाली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी नाट्यगृह रिकामे असेल तिथे चित्रपटाचे खेळ दाखविण्यात यावेत, अशी मागणी समोर आली. ही मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष गार्गी फुले यांनी सर्वप्रथम केली. तसा प्रस्ताव त्यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्यातील ‘द बॉक्स’ या रंगमंचावर प्रदीप वैद्य यांनी ‘या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट दाखविला. त्याचे चार खेळ झाले. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तत्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी महापालिकांनाही याविषयी चर्चा करून निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यावर पुणे महापालिकेने गेल्या आठवड्यात बैठक घेतली. त्यात प्रायोगिक तत्वावर म्हणून २० डिसेंबर रोजी चित्रपटाचा पहिला शो लावण्यासाठी परवानगी दिली. त्यानूसार शुक्रवारी (दि.२०) पहिला चित्रपट यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झळकणार आहे. सांस्कृतिक विश्वासाठी, मराठी चित्रपटासाठी ही एक वेगळी सुरवात ठरणार आहे. हा प्रयोग राज्यभर सुरू झाला, तर अनेक मराठी चित्रपटांना रंगमंचावर आपला खेळ सादर करता येईल. प्रेक्षकांनाही चांगले चित्रपट पाहता येतील.
मराठी चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत जाण्यासाठी नाट्यगृहामध्ये त्याचे शो लावावेत, यासाठी अनेक महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करतोय. त्याला आता यश मिळत आहे. नाट्यगृहामध्ये नाटकाला डावलून कोणताही चित्रपट लावला जाणार नाही. ज्या नाट्यगृहात नाटक लागलेले नसेल, तिथेच चित्रपटाला वेळ देण्यात येईल, असा हा उपक्रम आहे.-बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग