मराठी भाषा संवर्धन उपक्रम
By admin | Published: January 6, 2016 12:29 AM2016-01-06T00:29:39+5:302016-01-06T00:29:39+5:30
मराठी वाङ्मय साहित्यात मोलाची भर घालून मराठी साहित्य समृद्ध करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सारस्वतांचा जीवनप्रवास आता आकाशवाणीवरून अनुभवता येणार आहे
पुणे : मराठी वाङ्मय साहित्यात मोलाची भर घालून मराठी साहित्य समृद्ध करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सारस्वतांचा जीवनप्रवास आता आकाशवाणीवरून अनुभवता येणार आहे.
महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पुढील वर्षभर दर बुधवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी साहित्यिकांची माहिती साहित्य प्रेमींना आपली मराठी या नावाचा हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. या आगळया वेगळया उपक्रमाची सुरूवात बुधवार (दि.६) पासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या भागात महापौर तसेच दुस-या भागात महापालिकां आयुक्तांचे मनोगत असणार आहे. त्यानंतर ५० साहित्यकांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शहरात भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आकाशवाणीवरून प्रसिध्द साहित्यिकांचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. पुढील संपूर्ण वर्षभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या २२ भागांचे रेकॉर्डींग पूर्ण करण्यात आले असून बुधवारी सकाळी पहिल्या भागात महापौरांचे मनोगत असणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. हा कार्यक्रम दहा मिनिटांचा असणार असून त्यात भाषा संवर्धन समितीमधील सदस्य ज्येष्ठ साहित्यिकांचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यात त्यांची साहित्य संपदा तसेच जीवन प्रवास शब्दातून मांडणार आहेत. (प्रतिनिधी)