मराठी भाषिकच भाषेबाबत उदासीन
By admin | Published: June 28, 2017 04:27 AM2017-06-28T04:27:47+5:302017-06-28T04:27:47+5:30
मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते, असा प्रश्न पडतो, असे मत एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
स्वामीकृपा सभागृहात सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, पंडित वसंतराव
गाडगीळ, कबीरबाग मठ संस्थेच्या
डॉ. सुधा पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुनील देवधर यांना ‘आंतरभारती पुरस्कार,’ प्रतिभा शाहू मोडक यांना ‘सहधर्मचारिणी पुरस्कार,’ माधवराव साठे यांना ‘पंडित माधवराव सप्रे
स्मृती लोकमान्य पुरस्कार,’ दिनेश बर्वे यांना ‘मुद्रांजली पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गोखले म्हणाले, ‘मराठी ही बहुसंख्येने बोलली जाणारी भाषा आहे. संख्येच्या तुलनेत मराठी भाषेचा भारतात चौथा व जगात एकोणिसावा क्रमांक लागतो. देशाची, राज्याची भाषा म्हणून मराठीचा अभिमान महत्त्वाचा आहे. इथले लोक जेव्हा परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते इंग्रजीत बोलतात. पण इतर देशातले लोक परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते त्यांच्याच भाषेत बोलतात. आपण छोट्या कृतींतून आपल्या भाषेचा लय करत चाललो आहोत, ही खेदाची बाब आहे. अलीकडे बऱ्याच भाषांमधील साहित्याचा अनुवाद मराठीत होत आहे, ही बाब आशादायक आहे. मराठीत चांगली ज्ञानशृंखला यानिमित्ताने येत आहे; पण ती टिकविण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.’
गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या ‘कबीर आणि महाराष्ट्र’ या चर्चासत्रात सादर झालेल्या निबंधांची पुस्तिका प्रकाशित करण्यात
आली. सुनील देवधर, सुधा पंडित, प्रतिभा शाहू मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन मुक्ता कुलकर्णी-गरसोळे यांनी केले.