Marathi Bhasha Din: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; पुण्यातील ५०० विद्यार्थी पाठवणार मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 02:16 PM2022-02-23T14:16:23+5:302022-02-23T14:16:34+5:30
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असून यासाठी आता मराठी शाळा सुद्धा पुढे आल्या आहेत
धनकवडी : मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी राज्यात साजरा होत असून त्या आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असून यासाठी आता मराठी शाळा सुद्धा पुढे आल्या आहेत. भारती विद्यापीठ, आंबेगावपठार येथील महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित राजश्री शाहू विद्या मंदिर व एस. एस. पवार ज्युनिअर काँलेज मधील विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. विद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी स्व हस्तक्षरात लिहिलेली पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचे नियोजन केले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्हि. एस. अंकलकोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जन अभियान सुरू करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना अंकल कोटे पाटील पुढे म्हणाले मराठी भाषा फार प्राचीन आहे. तिला वैभव आहे. सर्वच बाजूने हि भाषा परिपूर्ण असून सर्वात अधि मराठीला हा दर्जा मिळायला हवा होता. मात्र शालेय विद्यार्थी या मागणी साठी पुढे येत आहे हे खेदजनक आहे.
यावेळी, प्राचार्या अस्मिता जाणराव, उपप्राचार्य मंगेश तापकीर, प्रशासकीय संचालक उत्तमराव चव्हाण, मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अश्विनी दळवी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.