मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेलेत ; उदयसिंह पेशवा यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:48 IST2020-01-22T18:44:54+5:302020-01-22T18:48:12+5:30
बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली.

मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेलेत ; उदयसिंह पेशवा यांची खंत
पुणे: बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८८ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ते बोलत होते. तसेच ऐतिहासिक शनिवार वाड्याचा इतिहास मनात आठवत असतानाच शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा पुणेकर आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उदय वाडदेकर, अनिल नेने, प्रकाश दाते, मकरंद माणकीकर, उमेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
पेशवा म्हणाले, ऐतिहासिक वास्तूत सुधारणा झाली तर जास्तीत जास्त पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतील. या वास्तुकडे लक्ष देणे सरकारचे काम आहे. शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राचे भूषण आहे.वाड्याचे वरच्या भागातील लाकूड काम पडण्याच्या अवस्थेत आहे. तसेच या दिल्ली दरवाज्याची अवस्था फारच बिकट आहे. सरकारने शनिवारवाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने अशी अवस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही पेशव्यांची आहे हे लक्षात ठेवावे. आम्ही शनिवारवाड्याच्या सुधारणेबाबत कोणालाही भेटणार नाही. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन याबाबत विचार करावा.
मोहन शेटे म्हणाले, या जागेवर १० जानेवारी १७३० रोजी भूमीपूजन झाले होते आणि त्यानंतर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तूशांत झाली. अनेक वर्षांनी हा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला आहे आणि अनेक आठवणी मनात येत आहेत. शनिवार वाड्यासारख्या भव्य वास्तू महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक असतील परंतु या वास्तुसमोर जो पराक्रम घडला आहे, त्या पराक्रमाची तुलना करता येणार नाही. सतत ८० वर्ष भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज पानिपतच्या रणसंग्रामाची देखील आठवण होत आहे. पानिपतच्या युध्दात मराठे लढले, आपल्या मातीची लाज राखण्यासाठी.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी. अशा पराक्रमाचा इतिहास या वाड्याला लाभलेला आहे.