मराठी माणूस दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद देतो, त्या तुलनेत मराठी चित्रपटांना देत नाही, मधुगंधा कुलकर्णींची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 16:42 IST2024-12-22T16:41:38+5:302024-12-22T16:42:21+5:30
पुष्पासारख्या चित्रपटाचे सगळ्यात जास्त म्हणजे सुमारे चारशे कोटी रूपयांचे कलेक्शन हे एकट्या महाराष्ट्रातून झाले आहे

मराठी माणूस दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद देतो, त्या तुलनेत मराठी चित्रपटांना देत नाही, मधुगंधा कुलकर्णींची खंत
पुणेः मराठी साहित्य आणि चित्रपट विश्वाला दिग्गज लेखक-साहित्यिकांची परंपरा लाभली आहे. आपल्या पूर्वसुरींनी आशय घनतेच्या बाबतीत या क्षेत्रांमध्ये फार मोठे काम करून ठेवलेले आहे. पण ज्या ताकदीने मराठी माणूस दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद देतो, त्या तुलनेत मराठी चित्रपटांना देत नाही. मराठी चित्रपट सृष्टीमागे मराठी माणसांनीच भक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
साहित्यिक आणि सांस्कृतिक जगतात गेली ५९ वर्षे कार्यरत असलेली साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही संस्था यंदा हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने आयोजिलेल्या ४० व्या स्त्री साहित्य संमेलनात रविवारी (दि.२२) 'गप्पा कलावंतांशी' हा कार्यक्रम झाला. यामध्ये मधुगंधा कुलकर्णी आणि लेखक व दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी स्वाती महाळंक आणि डॉ. वर्षा तोडमल यांनी संवाद साधला.
मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, पुष्पासारख्या चित्रपटाचे सगळ्यात जास्त म्हणजे सुमारे चारशे कोटी रूपयांचे कलेक्शन हे एकट्या महाराष्ट्रातून झालेले आहे. वसुलीची ही खात्री असल्यामुळेच दाक्षिणात्य निर्माते मोकळ्या हाताने खर्च करून चित्रपट निर्मिती करीत असतात. याची अगदी उलट बाजू मराठी चित्रपट निर्मात्यांची असते. वसुलीची शाश्वती नसल्याने सतत हात आखडता घेत निर्मिती करावी लागते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट आणि निर्मात्यांना निर्मितीच्या मूल्यमापनाच्या कसोटीवर उभे देखील केले जात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे.
परेश मोकाशी म्हणाले, 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' या नाटकात वैचित्र्यपूर्ण विनोद असून हे नाटक यशस्वी होईल. याबाबत मला अजिबात खात्री नव्हती. परंतु, बघता बघता त्या नाटकाचे सहाशे-सातशे प्रयोग झाले. त्या नाटकात असलेल्या अकरा पात्रांची मोट बांधून त्या नाटकाचे सातत्याने प्रयोग करणे अशक्य असल्याने त्या नाटकाचे माध्यमांतर करून 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. माझ्या वाटचालीत आणि जडणघडणीत पृथ्वी थिएटरचा मोलाचा वाटा आहे. पृथ्वी थिएटरमध्ये शिकलेली प्रकाशयोजना, नेपथ्य, बॅक स्टेजची कामे हा अनुभव माझ्या वाटचालीत खूप उपयुक्त ठरत आहे.