बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे
By अजित घस्ते | Updated: December 23, 2024 18:21 IST2024-12-23T18:21:19+5:302024-12-23T18:21:59+5:30
बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) यशस्वी वाटचाल सुरू आहे. स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजनांमार्फत विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माणसाचा टक्का वाढला असून, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असा आशावाद महासंचालक सुनील वारे यांनी व्यक्त केला.
रविवारी बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन येरवडा येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय सचिव विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बार्टीच्या निबंधक इंदिरा आस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोसले, रवींद्र कदम, शुभांगी पाटील, नरेश गोटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी येरवडा संकुलामध्ये विविध स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण वारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी संदेश उमाप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, भीमा कोरेगाव आणि महाड संग्राम आदी विषयांवर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध थोरात यांनी केले. निखिल सगरे यांनी आभार मानले.