निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:12 AM2023-08-03T09:12:09+5:302023-08-03T09:25:30+5:30
त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
निसर्गकवी, ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर (N D Mahanor) यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ना. धो. महानोर यांचं लिखाण हे निसर्गाशी नातं जोडणारं होतं. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे बोल होते. 'मी रात टाकली..मी कात टाकली' ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा'रानातल्या कविता' हा कवितासंग्रह खूप गाजला होता. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचं. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला. तर जळगावात त्यांचं शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेतीत रमले. त्यांच्या रानातील कवितांनी सर्वांनाच निसर्गाच्या प्रेमात पाडलं. 'दिवेलागणीची वेळ','पळसखेडची गाणी','जगाला प्रेम अर्पावे','गंगा वाहू दे निर्मळ' ही त्यांची लोकप्रिय कवितासंग्रह आहेत. तर 'एक होता विदूषक','जैत रे जैत','सर्जा','अजिंठा' या काही सिनेमांमध्ये त्यांनी गीतरचना केली. महानोर १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तर १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.