बडोद्यातही मराठी शाळा ओस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:25 AM2018-02-20T07:25:28+5:302018-02-20T07:25:40+5:30
महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यात चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत.
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यात चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या एकमेव सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.
एकीकडे ‘मराठी वाचवा’चे नारे आणि दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पूर यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. शासनाचे उदासीन धोरण, पालकांचा इंग्रजी माध्यमांकडील वाढता कल या समस्यांचा बडोद्यातील मराठी शाळाही सामना करत आहेत. साडेचार लाख मराठी बांधवांची लोकसंख्या असलेल्या बडोद्यामध्ये जे. एम. ज्युनियर हायस्कूल, महाराणी चिमणाबाई हायस्कूल, एच. जे. परिख मॉडेल हायस्कूल, महाराणी हायस्कूल फॉर गर्ल्स या केवळ चार मराठी शाळा अस्तित्वात होत्या. गेल्या ४-५ वर्षांमध्ये यापैकी तीन शाळा बंद पडल्या आहेत.
१९११ मध्ये स्थापन झालेल्या आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे माजी विद्यार्थी असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेमध्ये सध्या ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बडोदा शहराचा विस्तार झाल्याने अनेक निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांचे दूरवर स्थलांतर झाले. या कुटुंबातील मुलांना शाळेला येण्या-जाण्याचा खर्च परवडत नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थीसंख्येवर होत आहे. त्यामुळे ही संख्या टिकवून ठेवण्यासाठी मुलांना ने-आण करणाºया रिक्षाच्या भाड्यात ५० टक्के सवलत पुढील शैक्षणिक वर्षापासून देण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे. यामुळे तरी पालक आणि विद्यार्थ्यांचा मराठी शाळेकडील ओढा टिकून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.