मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:24 AM2018-02-27T06:24:03+5:302018-02-27T06:49:30+5:30

आपण मराठीमध्ये बोलल्यास लोक आपल्याला कमी लेखतील, असा न्यूनगंड विनाकारण बाळगला जातो. याबाबत विविध ठिकाणी जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, मराठी भाषिक हा न्यूनगंड बाळगत असल्याचे अधोरेखित झाले.

 In Marathi speakers, the lower level of the mother language, the language has to be tried at all levels | मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न

मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न

googlenewsNext

पुणे : हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्सपासून मंडई, बस स्थानक अशा अनेक ठिकाणी मराठी भाषिक असले, तरी ते मराठीत न बोलता हिंदीमध्ये बोलतात, असे प्रसंग शहरातील अनेक ठिकाणी अनुभवायला मिळाले. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर मराठी भाषिकच मराठी बोलायला कचरतात, ही वस्तुस्थिती सर्वत्र पाहायला मिळाली. दररोजच्या व्यवहारातही सर्रास हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. आपण मराठीमध्ये बोलल्यास लोक आपल्याला कमी लेखतील, असा न्यूनगंड विनाकारण बाळगला जातो. याबाबत विविध ठिकाणी जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, मराठी भाषिक हा न्यूनगंड बाळगत असल्याचे अधोरेखित झाले. निमित्त होते उद्या (दि. २७) होणा-या मराठी राजभाषा दिनाचे.
सध्या रस्त्यावरील विक्रेत्यांपासून हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स अशा ठिकाणी हिंदी भाषिक बहुसंख्येने असल्याचा समज सर्वदूर पसरला आहे. त्यामुळेच अशा ठिकाणी गेल्यावर आपण हिंदी अथवा इंग्रजी भाषेतच बोलले पाहिजे, असा दंडक घालून घेतला जातो. अनेकदा नेमका हिंदी किंवा इंग्रजी कोणता शब्द वापरायचा हे सुचत नाही आणि त्यामुळे अनेक मजेशीर प्रसंगही घडतात.
आजकाल ब-याच ठिकाणी सुरक्षारक्षक आपणहून ‘नमस्कार’ असे म्हणत मराठीमध्ये संवाद साधायला सुरुवात करतात. त्यामुळे दडपण कमी होते आणि संवादही सुकर होतो. विक्रेते परप्रांतीय असले, तरी अनेक वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने त्यांना मराठी बºयापैकी बोलता येते. ‘आम्हाला मराठी बोलायला येत असले, तरी बरेचदा ग्राहकच हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतात’, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. आपणच दैनंदिन जीवनात मराठीमध्ये संवाद साधण्याचा दंडक घालून घेतल्यास भाषा नक्कीच टिकून
राहील आणि पुढील पिढीलाही भाषेची गोडी लागेल, शब्दसंपदा वाढेल, असे मत मराठी भाषाप्रेमींकडून नोंदविण्यात आले.
वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त मराठीची आजची स्थिती जाणण्याचा हा प्रयत्न.
प्रसंग पहिला-
स्थळ : मल्टिप्लेक्स
१ : दो मूव्ही तिकिट देना
२ : कौन सी साईड का दू?
१ : दाये साईड का..
२ : लेफ्ट या राईट?
१ : (थोडेसे गोंधळून डावा हात उचलत) इस बाजू का...
२ : डाव्या बाजूचे हवे आहे का?
१ : हो, हो. तुम्हाला मराठी येतं का?
२ : हो मी मराठी भाषिकच आहे.
१ : हुश्श! सुटलो.
प्रसंग दुसरा-
फाईव्ह स्टार हॉटेलचा
स्वागतकक्ष : नमस्कार
ग्राहक : नमस्ते, मुझे कुछ एनक्वायरी करनी है. मेरी दादी माँ की साठवी सालगिराह है, मुझे फंक्शन के लिये हॉल बूक करना है.
स्वागतकक्ष : डेट और टायमिंग?
ग्राहक : अगले सोमवार को शाम को ७ बजे.
स्वागतकक्ष : ओके, इस डायरी में आप का नाम लिख दिजिए.
(नाव वाचल्यानंतर)
तुम्ही तर मराठी आहात!
अहो, मग मराठीत बोला ना! काहीच अडचण नाही. तुम्हाला सर्व माहिती मराठीत मिळेल.
प्रसंग तिसरा-
स्थळ : भाजी मंडई
कोथिंबीर कशी दिली?... बीस रुपया गड्डी... अरे मराठी येते ना तुला.. हो पण भाजी घेताना अनेक मराठी लोक पण हिंदीत बोलतात आणि चेह-यावरून कळत नाही ना, मराठी की अमराठी? म्हणून मी आपलं हिंदीत बोलतो... कोणी मराठी बोललं तरच मराठी. नाही तर हिंदी सुरू... धंदा करायचा म्हटल्यावर मोडकं-तोडकं हिंदी बोलून काम चालू ठेवायचं.. भाजी मंडईमध्ये गेल्यावर अनेक वेळा अस्सल मराठी विक्रेते व ग्राहकांच्या तोंडी सर्रास हिंदी संवाद कानी पडतो.
प्रसंग चौथा-
भैया... दो पाणीपुरी देना!
मागील काही वर्षात शहरात पाणीपुरी, कच्छी दाबेली, विविध प्रकारच्या सरबतांचे गाडे रस्तोरस्ती उभे राहिले आहेत. याठिकाणी सायंकाळनंतर तरूणाईची मोठी गर्दी लोटते. पण बहुतेक जण इथे गेल्यानंतर विक्रेत्याशी थेट हिंदीतच बोलायला सुरूवात करताना दिसतात. ‘भैया.. दो पाणीपुरी देना, और कम तिखा करना’, असा हुकूम सोडल्यानंतर दोन मित्र मात्र परस्परांशी मराठीत बोलायला सुरूवात करतात. हे चित्र बहुधा आता सर्वच ठिकाणी दिसायला लागले आहे. प्रत्येक विक्रेता हिंदी भाषिक आणि त्याला मराठी समजत नसल्याचे समजून त्याच्याशी हिंदीतच संवाद साधला जातो. प्रत्यक्षात अनेक हिंदी भाषिकांना चांगली मराठीही बोलता येते. त्यांना मराठी बोललेलेही कळते. पण तरीही मराठी लोकच त्यांच्याशी हिंदीत संवाद साधतात.

Web Title:  In Marathi speakers, the lower level of the mother language, the language has to be tried at all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.