सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठीचे विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत; परीक्षा देण्यास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:07 PM2017-12-12T13:07:33+5:302017-12-12T13:13:20+5:30
हजेरीसंबंधी विद्यापीठाने खुलासा करण्यास उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितले आहे. मात्र, अनेक दिवस उलटले तरी प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला नाही. परीक्षा सुरू असताना त्याचा निर्णय होत नसल्याने मराठी विभागाचे अनेक विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नियमानुसार एक महिन्याची नोटीस का दिली नाही, याचा विद्यापीठाने खुलासा करण्यास उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितले आहे. मात्र, अनेक दिवस उलटले तरी अद्याप प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला नाही. एकीकडे परीक्षा सुरू असताना त्याचा निर्णय होत नसल्याने मराठी विभागाचे अनेक विद्यार्थी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने अचानक ७५ टक्के हजेरीच्या नियमावर बोट ठेवून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा बसण्यास मनाई केली आहे. वस्तुत: ७५ टक्के हजेरीचा नियम विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व विभाग व सर्व महाविद्यालये यांना लागू आहे. मात्र केवळ मराठी विभागाकडूनच ही कारवाई का केली जात आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मराठीच्या काही विद्यार्थ्यांनी विभागाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन केल्याने जाणीवपूर्वक त्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची कारवाई केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
परीक्षेला बसू न देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविरुद्ध दाद मागितली. त्या वेळी नियमानुसार विद्यार्थ्यांना एक महिना अगोदर नोटिसा बजावणे आवश्यक असताना ती बजावल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे याबाबत खुलासा करावा, असे पत्र संचालकांनी विद्यापीठाला पाठविलेले आहे. मात्र, प्रभारी कुलसचिव परदेश दौऱ्यावर असल्यामुळे अद्याप पत्र पाठविण्यात आलेले नाही. मराठी विभागाकडून हजेरीपत्राचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यात आलेले नाही. अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती असतानाही त्यांना परीक्षेला बसू दिलेले नाही, तर काही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असतानाही त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनाच टार्गेट करण्यासाठी हा कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
हजेरी न भरल्याप्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु समितीने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय देणे आवश्यक असताना एक पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढचे पेपर देण्यास मनाई केली आहे.
आंदोलन केल्याने केले टार्गेट
विद्यार्थ्यांना निकाल दाखवावा यासाठी मराठी विभागातील काही विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्याचबरोबर तिथल्या क्लार्ककडून योग्य वागणूक मिळत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक काही विद्यार्थ्यांना टार्गेट करून परीक्षेला बसू दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
अंतिम हजेरीपत्रच लावले नाही
मराठी विभागाच्या दोन विषयांचा अपवाद वगळता इतर विषयांच्या हजेरी नियमित घेण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या हजेरीचे अंतिम हजेरीपत्रक विभागाकडून लावण्यात आले नाही. नियमानुसार एक महिन्याची नोटीस देणे अपेक्षित असताना परीक्षा सुरू असताना हॉलमधून बाहेर काढण्यात आले, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांच्याकडे केल्या आहेत.