मराठी तंत्रस्नेही व्हावी, माध्यमांतरही गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:34 AM2019-02-27T01:34:50+5:302019-02-27T01:34:55+5:30
मराठी राजभाषा दिन विशेष : आॅडिओ बुक, ई-बुकमुळे वाचनाचे प्रमाण आशादायी
- प्रज्ञा केळकर-सिंग।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इतर भाषांनी ज्या वेगाने तंत्रज्ञान आत्मसात केले, त्या तुलनेत मराठीचा वेग काहीसा कमी पडला. मात्र, सोशल मीडियामुळे मराठीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘अच्छे दिन’ टिकवून भाषा ‘दीन’ होऊ द्यायची नसेल तर ती तंत्रस्नेही व्हायला हवी, असा नवा सूर जाणकारांमधून उमटत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये गुगल इंडियाक कीबोर्ड, आॅडिओ टू टेक्स्ट कन्व्हर्टर, इंटरनेटवर गुगल ट्रान्सलेट, मराठी अॅप्लिकेशन्स आदींच्या माध्यमांतून मराठीचा वापर वाढवण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे मुद्दे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
इंग्रजी आणि मराठी भाषेच्या दैनंदिन वापरातील तुलना केली तर मराठी काहीशी मागे पडत असल्याचे चित्र पहायला मिळते. संभाव्य धोका ओळखून तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही मराठीचा वापर वाढून ती जिवंत ठेवणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले जात आहे.
आयटीतज्ज्ञ आणि लेखक डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ‘मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. सोशल मीडियामुळे बदलत्या स्वरूपातील मराठी युवा पिढीमध्ये लोकप्रिय होत आहे. मुद्रित माध्यमातही तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. भाषेचे माध्यमांतर झाल्यास वापरही आपोआप वाढेल.
पुस्तके आॅडिओ बुक, ई-बुकच्या स्वरूपात उपलब्ध होत असल्याने वाचनाचे प्रमाणही आशादायी आहे. मात्र, काही अपवाद वगळता सर्व लेखक, प्रकाशकांनी हे माध्यमांतर आपलेसे केलेले नाही. ज्या वेगाने इतर भाषांनी तंत्रज्ञान आत्मसात केले,
त्या वेगाने मराठी भाषा पुढे गेली नाही.’
लेखक डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, ‘सोशल मीडियावर मराठीचा वापर अत्यंत आशादायी आणि सकारात्मक आहे. या माध्यमातून साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. पूर्वी मराठी लिहिण्यासाठी रोमन लिपी वापरली जायची. तांत्रिक प्रगतीमुळे देवनागरी लिपी वापरली जात आहे. काळानुसार मराठीचे भाषिक वळण बदलत आहे, हे विसरून चालणार नाही.
मराठी ब्लॉग्ज, ट्विटर संमेलन
४ब्लॉग हा तरुणाईच्या परवलीचा शब्द बनला आहे. मनातील विचार, आयुष्यातील घडामोडी, आजूबाजूच्या घटनांवरील भाष्य याबाबत व्यक्त होण्यासाठी तरुणाईकडून ब्लॉगचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. मराठी ब्लॉगर्स डॉट नेटच्या माध्यमातून मराठी ब्लॉग व संकेतस्थळांचे एकत्रीकरण केले आहे. गेल्या वर्षी ट्विटर साहित्य संमेलनही भरवण्यात आले होते.
सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप ही माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामध्ये मराठी टायपिंगची सुविधा उपलब्ध आहेत. गुगल ट्रान्सलेट, गुगल इंडियाक कीबोर्ड, आॅडिओ टू टेक्स्ट अशा सोयींचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला हवा. ट्रेंड म्हणून अनेक जण स्मार्ट फोन वापरतात. मात्र, तो भाषेसाठी कसा वापरायचा, हेच अनेकांना माहीत नसते. माध्यमांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. मराठीची घरपोच शिकवणी, अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी अशा पर्यायांचा वापर करता येऊ शकेल.
- दीपक शिकारपूर
‘टाईपलं’ सारखे शब्द वापरून आपण इंग्रजीतील क्रियापदाचे मराठीकरण केले. याला भाषा भ्रष्ट केली असे म्हणता येणार नाही. पूर्वीच्या काळीही संस्कृत, पर्शियन शब्दांचे मराठीकरण केल्याचे दाखले आढळतात. सध्याच्या पिढीला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषा आपल्याशा वाटतात. त्यामुळे मराठीच्या वापराबाबत प्रगतीला वाव असला तरी सध्याचे चित्रही अजिबात नकारात्मक नाही.’
- डॉ. आशुतोष जावडेकर