Fractured Freedom | 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'च्या मराठी अनुवादाची दोनच दिवसांत ४०० प्रतींची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:23 AM2022-12-16T10:23:26+5:302022-12-16T10:25:01+5:30
सोमवारपर्यंत बाजारात दुसरी आवृत्ती दाखल होण्याची शक्यता...
पुणे : पुस्तकावरून एखादा वादंग निर्माण झाला की, त्या पुस्तकात नक्की काय आहे, हे जाणून घेण्याकरिता वाचकांकडून त्या पुस्तकाला मागणी वाढते. कोबाड गांधी यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनघा लेले यांनी केलेल्या अनुवादित मराठी पुस्तकाबाबत हेच झाले आहे. दोनच दिवसात राज्यभरात पुस्तकाच्या तब्बल ४०० प्रतींची विक्री झाली. विशेष म्हणजे, पुस्तकाची मागणी पाहता प्रकाशकांना पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढण्याची वेळ आली असून, सोमवारपर्यंत बाजारात दुसरी आवृत्ती दाखल होण्याची शक्यता आहे.
पुस्तकाविषयी वादंग उठल्यावरच असं काही पुस्तक बाजारात आलं आहे हे वाचकांना कळते. तोवर वाचकांना पुस्तकाविषयी काहीच कल्पना नसते. कोबाड गांधी यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकाला राज्य शासनाने पुरस्कार जाहीर केला आणि अचानक तो मागेही घेतला. या घटनेची वाचकांनी गांभीर्याने दखल घेतली आणि नक्की पुस्तकात काय आहे हे जाणून घेण्याकरिता वाचकांच्या जणू पुस्तकावर उड्या पडायला सुरुवात झाली.
लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. वाचकांच्या वाढत्या मागणीला प्रकाशक राजीव बावडेकर यांनी दुजोरा दिला आहे. हे पुस्तक नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रकाशित झाले. वर्षभरात पुस्तकांच्या ४०० प्रतींची विक्री झाली होती. मागील दोनच दिवसात राज्यभरात पुस्तकाच्या ४०० प्रतींची विक्री झाली आहे. पुस्तकाच्या सर्व प्रती संपल्या आहेत. त्यामुळे दुसरी आवृत्ती छपाईसाठी दिली असून, सोमवारपर्यंत ती बाजारात येईल, असे ते म्हणाले.
वाचकांची मागणी कायम :
या पुस्तकाला मागणी खूप आहे. पुस्तकाच्या सर्व प्रती संपल्या आहेत. अजूनही वाचकांची मागणी कायम असून, पुस्तकासाठी नोंदणी झाली, हाेत आहे, असे अक्षरधारा बुक गॅलरी’चे रमेश राठीवडेकर यांनी सांगितले.