लंडनच्या अभ्यासक्रमातही असेल मराठी,  डॉ. माधवी आमडेकर यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:09 IST2025-01-17T07:09:06+5:302025-01-17T07:09:37+5:30

लंडनमधील शिक्षण पद्धती अन् तेथील सण-समारंभ कसे साजरे केले जातात? याबाबत त्यांनी माहिती दिली.

Marathi will also be in the curriculum of London, Dr. Madhavi Amdekar gave information. | लंडनच्या अभ्यासक्रमातही असेल मराठी,  डॉ. माधवी आमडेकर यांनी दिली माहिती 

लंडनच्या अभ्यासक्रमातही असेल मराठी,  डॉ. माधवी आमडेकर यांनी दिली माहिती 

पुणे : मराठी हा विषय लंडनमधील शिक्षणात असावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे लंडनमधील शिक्षणात मराठी भाषेच्या समावेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. लवकरात लवकर मराठीचा समावेश हाेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहाेत, अशी भावना मेटा कॉगनिझन कोर्सच्या निर्मात्या डॉ. माधवी आमडेकर यांनी व्यक्त केली. डॉ. आमडेकर यांनी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट देत मुक्त संवाद साधला.

लंडनमधील शिक्षण पद्धती अन् तेथील सण-समारंभ कसे साजरे केले जातात? याबाबत त्यांनी माहिती दिली. त्या सध्या केंब्रिजच्या मराठी विभागाच्या प्रमुख आहेत.  डॉ. आमडेकर म्हणाल्या, ‘एक लक्षात आले की, आपला देश जेव्हा ‘पेसा’सारख्या परिषदेत सहभागी होतो आणि ७५ पैकी, भारताचे स्थान ७३ वे असते तेव्हा मला कल्पना सुचली आणि मेटा कॉगनिझन कोर्सची निर्मिती केली. कालांतराने स्वत:चे महाविद्यालय का नको, ही कल्पना मनात आली आणि ती सत्यात उतरवली. यामध्ये विज्ञान, आरोग्य, हॉस्पिटॅलिटी, सोशल अशा विविध गोष्टी मुलांना शिकवायचो आणि त्यातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगारही मिळाला. मात्र, शैक्षणिक संस्था कोरोना काळानंतर बंद करावी लागली. 

लंडन येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. बिल लुकास हे मागील अनेक वर्षांपासून पेसासाठी काम करीत आहेत. पेसामध्ये सहभाग घेण्यासाठी असलेले निकष पूर्ण करण्यात कायम चीन आणि अमेरिका अग्रेसर असतात. मग, भारत का नाही? हा विचार करून मेटा कॉगनिझन कोर्सची निर्मिती केली. या कोर्सच्या माध्यमातून कोणत्या परिस्थितीत आपण कशा पद्धतीने काम करावे? हे शिकवले जाते. यातून अनेकांना फायदा झाला असल्याचे डॉ. आमडेकर यांनी सांगितले. 

मेटा कॉगनिझन कोर्सची निर्मिती केल्यानंतर अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळाला असून ६० तासाचा ऑनलाईन कोर्स आहे. या कोर्सला अनेक शाळा, महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूट्सनी त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, अशी आशा डॉ.आमडेकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Marathi will also be in the curriculum of London, Dr. Madhavi Amdekar gave information.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी