" मराठी " कधीच मरणार नाही : नोहा मस्सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:16 PM2019-05-27T13:16:56+5:302019-05-27T13:17:33+5:30
आजी-आजोबांच्या माध्यमातून मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचविली जाईल. ते मराठी मरू देणार नाहीत
पुणे : ’मराठी’ कधीच मरणार नाही. आजी-आजोबांच्या माध्यमातून मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचविली जाईल. ते मराठी मरू देणार नाहीत असा विश्वास भारतीय बेने इस्त्राइल समाजाचे आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि साहित्यिक नोहा मस्सील यांनी व्यक्त केला.
गेली चाळीस वर्षे इस्त्राइल मध्ये ‘मायबोली’ मासिकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार मराठीची पताका यशस्वीपणे फडकविणाऱ्या नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त नोहा मस्सील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
नोहा मस्सील यांनी भारतीय बेने इस्त्राइल समाजाचा इतिहास यावेळी कथन केला. ते म्हणाले, रोमन सरदाराने हल्ला करून जेरूसलेम जिंकले. ज्यूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. त्यातून जीव वाचवून असंख्य ज्यू देश सोडून वाट फुटेल तिकडे पळाले. काहींना व्यापार आणि दयावर्दी पेशामुळे भारत माहिती असल्यामुळे छोट्या मोठ्या गलबतात बसून ते भारताच्या दिशेने निघाले. मात्र वादळवा-यात अनेक गलबते फुटली. जे सुदैवाने बचावले ते अलिबाग किनाऱ्याजवळ अलिबाग जवळच्या चौल (नौगाव) बंदराजवळच्या किनाऱ्याला लागले. दुर्दैवी सहप्रवाशांचे मृतदेह कोकणवासियांनी धार्मिक कर्तव्य म्हणून हिंदू पद्धतीने दहन केले. आजही नौगाव येथील समुद्र किना-यावर ही ज्यू लोकांची जुनी एकत्रित दफनभूमी आहे. हे आलेले ज्यू स्वत:ला बायबलमधील परंपरेप्रमाणे ‘बेने इस्त्राइल’ म्हणवून घेऊ लागले. माझा जन्म आणि बालपण भारतातच गेले. वयाच्या 24 व्या वर्षी मी पितृभूमीच्या आंतरिक ओढीने इस्त्राइलला स्थलांतरित झालो.
भारत सोडताना पाय निघत नव्हता. ‘नव्हतो आलो आक्रमक म्हणूनी, नव्हतो, आलो व्यापारी बनूनी युद्धात आपला देश गमावूनी ,आलो होतो आश्रित म्हणूनी, अशी भावना मनात रूंजी घालत होती. दोन्ही संस्कृती वेगळ्या असल्याने सुरूवातीला काहीसे अवघड गेले. भारतीय ज्यू म्हणून वेगळं राहायचो पण देशाच्या विविध भागातून ज्यू लोक प्रस्थापित झाल्यामुळे सर्वजण एकत्रितपणे मिसळून गेलो. हिब्रू भाषा सगळ्यांना यायला हवी असा इस्त्राइलचा नियम आहे. आम्ही हिब्रूभाषेत प्रार्थना करायचो पण अर्थ काळायचा नाही. त्यासाठी सहा महिने ट्रेनिंग घ्यावे लागले. कामचलाऊ भाषा म्हणून शिकलो. तिथे सणांच्या माध्यमातून लोकांना राष्ट्रवादाचे धडे दिले जातात. हा देश ज्यूंच्या हातात असला तरी इस्त्राइल अरबांनाही सामावून घेतले आहे. देशाची लोकसंख्या अधिकाधिक वाढावी यासाठी कुटुंबातील प्रत्येक मुलाला सरकारकडून 18 वर्षांपर्यंत दीड हजार शेकल दिले जातात असे त्यांनी सांगितले.
इस्त्राइलमध्ये सुमारे 30 हजार मराठी ज्यू आहेत. आम्ही महाराष्ट्र दिन तिथे मोठ्या उत्साहात साजरा करतो. ’ मायबोली’ या मासिकाच्या माध्यमातून मराठी भाषा आम्ही जिवंत ठेवली आहे. आमच्या पुढच्या पिढीला मराठीचा गंध नसला तरी आम्ही भारत आणि मराठीचे प्रेम जपले आहे. मराठी कधीच मरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
............
मोदींमुळे भारत-इस्त्राइल संबंध अधिक दृढ झाले
पूर्वी पंडित नेहरूंचे इस्त्राइलबाबत धोरण तटस्थ असायचे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध फारसे चांगले नव्हते. 1992 नंतर भारत ईस्त्राईलचे संबंध अधिकृतपणे प्रस्थापित झाले. वाजपेयी सरकारच्या काळात भारत आणि ईस्त्राईलचे संबंध सुधारण्यास सुरूवात झाली. मोदी सत्तेत आल्यानंतर हे संबंध अधिकच दृढ झाले. पूर्वी भारत गरीब देश वाटायचा पण आता सन्मान मिळत असल्याची भावना नोहा मस्सील यांनी व्यक्त केली.