‘हॅरी पॉटर’च्या धर्तीवर येणार मराठमोळा ‘हरी पाटकर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:04+5:302021-01-10T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “हॅरी पॉटर’ हे इंग्रजीतील खास मुलांसाठीचे अत्यंत गाजलेले पात्र आहे. परंतु या पुस्तकांबद्दल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “हॅरी पॉटर’ हे इंग्रजीतील खास मुलांसाठीचे अत्यंत गाजलेले पात्र आहे. परंतु या पुस्तकांबद्दल माझे मत फारसे अनुकूल नाही. कारण या पुस्तकातून मुलांना आभासी विश्वाची सफर घडवली आहे. तिथली माती भारताच्या वातावरणाशी सुसंगत नाही. त्यासाठी आपल्या मातीतलाच नायक हवा. त्यामुळं हॅरी पॉटरच्या धर्तीवरच ‘हरी पाटकर’ हे मराठमोळं पात्र मुलांसाठी लिहिणार आहे. मराठमोळ्या नायकावर पुस्तक लिहिण्याचा नवीन वर्षाचा संकल्प आहे,” असे ज्येष्ठ बालसाहित्यकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म जोशी यांनी सांगितले.
हा मराठमोळा नायक इथल्या वातावरणाशी निगडित समस्या आपल्या कल्पकबुद्धीने सोडविण्याचा प्रयत्न करेल. त्यावर लेखन सुरू केल्याचे डॉ. जोशी म्हणाले. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ न. म. जोशी यांना अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १०) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते जीवनागैरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
डॉ. जोशी म्हणाले, “बऱ्याच लेखकांना असं वाटतं की परी, चेटकीण, राक्षस हेच मुलांचं विश्व आहे. ते आहेच. पण त्याही पलीकडे मुलांना वास्तवाकडे घेऊन जायचे तर झाडावरचे फुलपाखरू पाहताना त्यांच्या मनातही फुलपाखरू फुलले पाहिजे. तरंच ‘फुलपाखरू’ ही कविता शिकण्याचा आणि शिकविण्याचा आनंद मिळू शकेल. पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांनी मुलांचे रंजन आणि बोध या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधण्याचा विचार करावा. मुलांना वैज्ञानिक साहित्यही दिलं पाहिजे. ते कथास्वरूपात मांडणे शक्य आहे.”
चौकट
मुलांच्या हातात पुस्तकच हवं...
पुस्तकातल्या वाचून दाखविलेल्या धड्याचे मुलांना चांगले आकलन होते. त्या तुलनेत संगणकीय धड्याबाबतचे आकलन कमी असल्याचा निष्कर्ष आहे. मुलांना पुस्तकाची जवळीक आवडते. त्यांच्या हातात पुस्तकच दिले पाहिजे, याकडे डॉ न. म. जोशी यांनी लक्ष वेधले.