स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:39 PM2023-08-18T15:39:28+5:302023-08-18T15:40:06+5:30

आझादी का अमृत महोत्सव निमित्त रशियामध्ये दिला नारा

Marathmola Smita Ghuge hoists 75-foot tricolor flag on Mount Elbrus on Independence Day | स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

googlenewsNext

- पांडुरंग मरगजे

धनकवडी (पुणे) : पुण्याच्या स्मिता दुर्गादास घुगे हिने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी रशियातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूसवर चढाई करताना ३९०० मी ऊंचीवर ७५ फूटी तिरंगा फडकविला. मेरी माटी मेरा देश माटी को नमन वीरो को वंदन आझादी का अमृत महोत्सव निमित्त रशिया मध्ये दिला नारा. त्याचबरोबर ५ हजार ६४२ मीटर उंचीचे हे माउंट एल्ब्रूस शिखर पादाक्रांत करण्याचाही विक्रम केला. 

रशिया-युरोप खंडामधील सर्वोच्च शिखर अशी माउंट एल्ब्रूस शिखराची ओळख आहे. ५ हजार ६४२ मीटर अर्थात १८ हजार ५१० फूट उंची असणारे हे शिखर सदैव बर्फाच्छादित असते. ऋण २५ डिग्री तापमान आणि वादळी वाऱ्यामध्ये या शिखरावर चढाई करणे अत्यंत कठीण व आव्हानात्मक होते. गिर्यारोहक स्मिता घुगे हिने हे शिखर पादाक्रांत करण्याचे आव्हान तर स्वीकारलेच त्याचबरोबर याच शिखरावर ३ हजार ९०० मी ऊंचीवर पोहोचल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत तिने नऊवारी साडी नेसून ७५ फूटी भव्य तिरंगा फडकवून नवा विश्व विक्रम केला. पुढे जाऊन माउंट एल्ब्रूस शिखर पादाक्रांत केले. '३६० एक्सप्लोरर' गिर्यारोहण संस्थेच्या आनंद बनसोडे यांच्या मार्गद्शनाखाली स्मिताने ही यशस्वी कामगिरी पूर्ण केली. तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्मिताचे ७ खंडांमधील ७ ऊंच शिखर सर करण्याचं स्वप्न आहे. या आधी स्मिताने माउंट किलीमांजारो आफ्रिका खंडामधील सगळ्यांत उंच शिखर ज्याची उंची १९ हजार ३४१ फुट (५८९५ मी) आहे येथे देखील ७५ फूट तिरंगा ध्वज १५ ऑगस्ट २०२१ रोजी फडकविला होता. सोबतच आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर देखील स्मिताने चढाई केली आहे. जिथे १९ फेब्रुवारी २०२२ ला शिवजयंती उत्सव एव्हरेस्ट बेस कँप ज्याची उंची ५ हजार ३६४ मी (१७५९८फुट) तिथे ४० फूट भगावा ध्वज आणि ७५ फुट तिरंगा ध्वज फडकावून भारताचा अमृत महोत्सव आणि शिवजयंती साजरी केली होती.

माऊंट एल्ब्रूस सर करणे हा माझ्यासाठी व संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात कठीण चढाई करताना मनात सदैव शिवरायांची धगधगती प्रेरणा होती. माझे कुटुंब, आनंद बनसोडे आणि महाराष्ट्रा तील तमाम जनतेच्या प्रेरणेमुळे मला हे यशमिळाले माझे हे यश मी शिवरायांना समर्पित करत आहे.

- स्मिता दुर्गादास घुगे, गिर्यारोहक धनकवडी (पुणे)

Web Title: Marathmola Smita Ghuge hoists 75-foot tricolor flag on Mount Elbrus on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.