मराठवाडा मुक्तीदिन सोहळा - २०२३: सुव्यवस्थेसाठी मराठवाडा हे वेगळे राज्य का नाही?
By प्रशांत बिडवे | Published: September 18, 2023 02:23 PM2023-09-18T14:23:27+5:302023-09-18T14:24:14+5:30
मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन सोहळा - २०२३ चे आयोजन करण्यात आले होते...
पुणे : भौगोलिकदृष्ट्या असलेले वेगळेपण, नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि सर्वात महत्वाचे सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी मराठवाडा हे स्वतंत्र राज्य का होऊ शकत नाही? असा प्रश्न लेखक संशोधक सूरज एंगडे यांनी उपस्थित केला.
मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन सोहळा - २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिर्ला ईरिक्सन लि. चे माजी अध्यक्ष विवेकानंद दत्तोबा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, लेखक, संशोधक डॉ. सुरज एंगडे हे उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी मेहत्रे, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख अरुण पवार यांच्यासह संदिपान पवार, दत्तात्रय शिनगारे, प्रकाश इंगोले, सुभाष गायकवाड, ऍड विलास राऊत, मराठवाडा युवा मंच अध्यक्ष सत्यजित चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय संचालक देविदास गोरे, सामाजिक पुरस्कार द प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णलाय, सास्तुर, ता. लोहारा, जि. धाराशिव, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार डॉ. बबन जोगदंड (यशदा), उद्योग पुरस्कार ट्रान्सव्होल्ट इंजिनिअरिंग प्रा.लि. मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध चव्हाण याना ''मराठवाडा भूषण पुरस्कार'' देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वा. सेनानी रामानंद तीर्थ स्मारक व सेवाभावी संस्था परभणी चे अध्यक्ष ऍड. जी. आर. देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वैभवशाली मराठवाडा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यसेनानीच्या नातेवाइक प्रयागबाई भीमराव कदम यांचाही सन्मान करण्यात आला. एंगडे म्हणाले, मराठवाडा हा भारताचे हृदय आहे. मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले मात्र, तरीही तरुणांना शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्या-मुंबई ला का यावे लागते? बर येणाऱ्या तरुणाईला सामावून घेण्याची या शहरांची काय व्यवस्था आहे? महाराष्ट्रच्या स्वातंत्र्यलढा इतिहासात उत्कृष्ठ स्वातंत्र्यसेनानी मध्ये मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसेनानीना स्थान का नाही? असा सवालही उपस्थित केला. मराठवाड्याचा इतिहास आणिइतर प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी मराठवाडा संशोधन केंद्र स्थापन झाले पाहिजे.