HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; ‘कॉपी’ला आळा घालण्यासाठी कडक नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:06 IST2025-02-10T18:03:33+5:302025-02-10T18:06:07+5:30
कॉपीमुक्त परीक्षा आणि कडक कारवाईचा इशारा

HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; ‘कॉपी’ला आळा घालण्यासाठी कडक नियमावली
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2025 बारावी परीक्षा उद्यापासून 11 फेब्रुवारी सुरू होत आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा 10 दिवस आधी सुरू होत असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस आहे. 15 मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
राज्यात 9 विभागीय मंडळांत परीक्षा, 3376 केंद्रांवर आयोजन
राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा घेतली जाणार आहे. 3373 मुख्य परीक्षा केंद्रे आणि 3376 परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांची संख्या आणि शाखावार वर्गीकरण
यंदाच्या बारावी परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी –
• विज्ञान शाखा – 7,68,967 विद्यार्थी
• कला शाखा – 3,80,410 विद्यार्थी
• वाणिज्य शाखा – 3,19,439 विद्यार्थी
• किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम – 31,735 विद्यार्थी
• टेक्निकल सायन्स – 4,486 विद्यार्थी
कॉपीमुक्त परीक्षा आणि कडक कारवाईचा इशारा
गेल्या परीक्षांमध्ये काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने यंदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. गैरमार्गाचा वापर होणाऱ्या केंद्रांवर परीक्षा केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.
गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथके आणि विशेष समित्या
संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभर 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक विभागीय मंडळात विशेष भरारी पथके आणि दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत.
विशेष सुविधा – आजारी किंवा अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा
जे विद्यार्थी वैद्यकीय, व्यापारिक किंवा तत्सम कारणांमुळे नियोजित तोंडी, प्रकल्प किंवा अन्य परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी 12, 15 आणि 17 मार्च रोजी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा आयोजित केली जाईल.
बारावी परीक्षा कालावधी – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
बारावी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 18 मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.