नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माेर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 08:51 PM2019-12-19T20:51:18+5:302019-12-19T20:53:15+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माेर्चा काढण्यात आला.
पुणे : देशभरात सर्वत्र नागरिकत्व सुधारणा कायद्याला विराेध हाेत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ माेर्चा काढला. यावेळी भारतीय तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात घेतला हाेता.
नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत संमत झाल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडून या कायद्याला माेठ्याप्रमाणावर विराेध हाेत आहे. दिल्लीमधील जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदाेलनला हिंसक वळण लागले. त्यांनंतर देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी माेर्चे काढले. बुधवारी एनएसयुआय आणि इतर संघटनांच्या माध्यमातून विद्यापीठात मशाल माेर्चा काढण्यात आला हाेता. या माेर्चाला खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे देखील उपस्थित हाेते. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोर्चा काढण्यात आला. त्यात विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सुधारित नागरिकत्त्व कायद्याला विरोध करण्यामागे राजकीय हेतू आहेत, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही आंदोलने करवून घेतली जात असल्याची भूमिका मांडतानाच कायद्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "अभाविप'चे महानगर मंत्री अनिल ठोंबरे, योगेश्वर राजपुरोहित, दयानंद शिंदे, स्वामिनी पोरे, शुभंकर भूतकर आदी उपस्थित होते.
हिंसक व विघातक आंदोलने थांबवण्यासाठी पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. तसेच सर्व राष्ट्रप्रेमी विद्यार्थी हे नागरिकत्व संशोधन कायद्याचे समर्थनच करत आहेत. असे मत अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी सभे दरम्यान मांडले.