एनआरसी, कॅब विरोधात विद्यापीठात मशाल मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 08:25 PM2019-12-18T20:25:29+5:302019-12-18T20:27:12+5:30
विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात बसून अभ्यास करणे अपेक्षित असताना त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणली
पुणे: एनआरसी, कॅब आणि पीपल्स रजिस्ट्रेशन देशभरात लागू करून धर्मानुसार नागरिकत्व ठरविण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. केंद्र शासनाच्या या संविधान विरोधी धोरणाच्या विरोधात आणि दिल्ली येथील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांनी ‘मशाल मोर्चा’ काढला. तसेच संविधान विरोधी विधेयकांच्या विरोधात देशातील प्रत्येक नागरिकाने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह पुणे शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ‘मशाल मार्च’मध्ये सहभाग घेतला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून पर्यावरण विभागाजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा दिल्या.मोर्चाच्या सुरूवातील विद्यार्थ्यांनी व खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
केंद्र शासन एनआरसी,नागरीकत्व सुधारणा विधेयक आणि पीपल्स रजिस्टरच्या निमित्ताने धर्मावरून भेदभाव आणि ध्रुविकरण करत असून हे संविधान विरोधी आहे. ‘पीपल्स रजिस्टर’ हे रजिस्टर तयार करून जातीय आणि धार्मिक समुहाचे विभागवार तपशील जाहीर करण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. देशातील नागरिकांची नोंदणी मतदार यादी, रेशनकार्ड,पॅनकार्ड,जन्मनोंदणी ,आधारकार्ड या माध्यमातून होते. तसेच ठराविक कालावधीनंतर देशाची जनगणना होते. त्यामुळे एनआरसीची गरज नाही,अशी भूमिका यावेळी विद्यार्थ्यांनी मांडली.
भारताचे नागरिकत्व हे धर्माच्या आधारावर नाही तर धर्मनिरपेक्ष आहे,असे संविधान सांगते. एनआरसीच्या निमित्ताने भीती ,दमन आणि ध्रुविकरणाच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा प्रत्येक भारतीयाने विरोध केला पाहिजे,असे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध गीतांमधून केंद्राच्या विधेयांकाचा विरोध केला.त्यास आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.तसेच जामिया विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणा-यांना शिक्षण झाली पाहिजे,अशी मागणी यावेळी केली.
--------------
केंद्र शासनाच्या एनआरसी,कॅप आणि पीपल्स रजिस्टेशन या संविधान विरोधी विधेयकांना संसदेमध्येच मी विरोध केला.एक नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आले आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात बसून अभ्यास करणे अपेक्षित असताना त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणली.यातच केंद्र शासनाचे अपयश दिसून येते.तसेच जामिया विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची उच्च स्तरिय चौकशी झाली पाहिजे.
- सुप्रिया सुळे, खासदार,