भरमसाठ आवक झाल्याने झेंडू रस्त्यावर
By admin | Published: October 12, 2016 01:33 AM2016-10-12T01:33:36+5:302016-10-12T01:33:36+5:30
सऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असल्याने दसऱ्याच्या दिवशी सकाळी पिंपरी बाजारपेठेत झेंडू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. दुपारी बारापर्यंत जोरदार विक्री झाली. मात्र,
पिंपरी : दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असल्याने दसऱ्याच्या दिवशी सकाळी पिंपरी बाजारपेठेत झेंडू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. दुपारी बारापर्यंत जोरदार विक्री झाली. मात्र, दुपारनंतर बाजारपेठेत अचानक गर्दी कमी झाल्याने आठ ते दहा रुपये किलोने झेंडूची विक्री झाली. भरमसाठ आवक झाल्याने विक्रेत्यांनी झेंडू रस्त्यावर टाकला.
नवरात्रोत्सवानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी बाजारपेठेसह शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यावर झेंडूची दुकाने थाटली होती. अष्टमीला ६० ते ७० रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली. तर सोमवारी नवमी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीला आणल्याने ४० ते ५० रुपयेप्रमाणे विक्री झाली. दसऱ्याच्या दिवशीदेखील बाजारपेठेत झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने सकाळपासूनच ३० रुपये दराने विक्री सुरू होती. झेंडू खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सकाळी आठपासूनच पिंपरीतील झेंडू बाजार गजबजल्याने रस्त्यावरून वाट काढणेदेखील अवघड झाले होते. बहुतांश विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी केल्यामुळे,मोठमोठ्याने आवाज देऊन ५० रुपयांना दोन किलो याप्रमाणे विक्री केली. दुपारी बारानंतर मात्र बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने विक्रेत्यांनीदेखील १० ते १५ रुपये किलोने झेंडूची विक्री केली. (प्रतिनिधी)