भांडगावला पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू
By admin | Published: May 31, 2016 02:09 AM2016-05-31T02:09:31+5:302016-05-31T02:09:31+5:30
धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरून शासकीय खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रुक्मिणी सतीश कोळेकर (वय २४, रा. भांडगाव, शेरेचीवाडी, ता. दौंड) असे तिचे नाव
यवत : भांडगाव (ता. दौंड) येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरून शासकीय खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रुक्मिणी सतीश कोळेकर (वय २४, रा. भांडगाव, शेरेचीवाडी, ता. दौंड) असे तिचे नाव आहे़ ही घटना काल सकाळी ११ वाजण्यापूर्वी घडली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या तरुणीच्या घराजवळ शासकीय खाण आहे. खाणीत असणाऱ्या पाण्यामध्ये ही तरुणी व गावातील अन्य महिला कपडे धूत होत्या. कपडे धुताना तरुणीचा अचानक पाय घसरल्याने ती खाणीच्या पाण्यात बुडाली.
दरम्यान, आपली कपडे धुण्यासाठी गेलेली भावजय एक तास झाला तरी का आली नाही हे पाहण्यासाठी तरुणीचा दीर अशोक कोळेकर खाणीवर गेले. तेथे अन्य महिलांना रुक्मिणी कपडे धुण्यासाठी आली होती, ती दिसली का? याबाबत विचारणा केली. अन्य महिला कपडे धुण्याच्या नादात असल्यानेही तरुणी पाण्यात बुडाल्याचे समजले नाही. तरुणीने धुण्यासाठी आणलेले कपडे पाण्याच्या कडेलाच असल्याने तरुणी बुडाल्याची शंका बळावली.
दीर अशोक याने आपल्या भावास बोलावून घेत पाण्यात शोध घेतला असता रुक्मिणीचा मृतदेह मिळून आला. यानंतर तरुणीस यवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
यवत पोलिसांना या घटनेची खबर दीर अशोक कोळेकर यांनी दिली असून, या घटनेचा
अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)