हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू; तिनं हिटरला कवटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:23 IST2021-09-21T20:23:17+5:302021-09-21T20:23:24+5:30
दौंड तालुक्यातील यवत स्टेशन येथील घटना : पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल

हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू; तिनं हिटरला कवटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
यवत : यवत स्टेशन येथील विवाहितेचा पाणी गरम करण्याच्या हिटरने करंट बसून मृत्यू झाला आहे. माहेरच्या लोकांनी मात्र, याप्रकरणी नवरा, सासू, दीर व नंदेच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. धनश्री अजित करडे (वय २१, रा.यवत स्टेशन, करडे वस्ती, ता. दौंड) असे करंटलागून मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
विवाहितेच्या पतीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत लहान मुलीला आंघोळ घालण्यासाठी इलेक्ट्रॉनिक हिटरने पाणी तापवत असताना विजेचा करंट लागून पत्नी धनश्री हिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे धनश्री यांची आई सविता बापू ढेरे (रा.महंमद वाडी, हडपसर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून यात, मुलीने आत्महत्या केली असून यास सासू शर्मिला राजाराम करडे, पती अजित राजाराम करडे, दीर सुजित राजाराम करडे (सर्व रा.यवत स्टेशन, करडे वस्ती), नणंद पूनम कैलास खैरे (रा.खामगाव फाटा, ता.दौंड) हे जबाबदार असल्याचा आराेप केला आहे.
त्यामध्ये सासरच्यांनी धनश्री हिला स्वयंपाक येत नसल्याचे कारणावरून तिचा अपमान करून चार चाकी गाडी घेण्यासाठी हुंड्याची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी करून तिला मानसिक व शारिरीक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. यामुळे तिने विजेचा हिटर सुरू करून त्यास कवटाळून आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल केल्या असून मृत विवाहितेचा पती अजित करडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.