मार्क कमी पडले, आईबाबा ओरडले, काय करू?
By admin | Published: June 1, 2017 02:37 AM2017-06-01T02:37:18+5:302017-06-01T02:37:18+5:30
दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले काय करू? परीक्षेत कमी गुण मिळालेली आणि नापास झालेली मुले आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होती. निकालाच्या दिवशी इतर कुणी नसले तरी किमान पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते; पण मंगळवारी हेल्पलाइनचे कर्मचारीच त्यांचे ‘पालक’ बनले होते... मनातले विचार व्यक्त करण्यासाठी राज्यातील अनेक मुला-मुलींनी हेल्पलाइनचा आधार घेतला.
परीक्षेचा निकाल म्हणजे जणू विद्यार्थ्यांसाठी सत्त्वपरीक्षाच असते... परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तर मुले आयुष्य संपविण्यापर्यंत पावले उचलतात, नैराश्य दूर करून त्यांना आधार देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांचीच असते. मात्र त्यांच्या दबावामुळे मुलांमध्ये नैराश्य येते, त्यांचे कुणीतरी ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मन मोकळे करायचे असते. यासाठी ही मुले हेल्पलाइनचा आधार घेतात, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आयुष्यात खूप संधी मिळतील अशा माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जाते, मंगळवारी दिवसभरात २ ते ८ या वेळेत सुमारे २0 ते २५ मुलांनी संपर्क साधला असल्याची माहिती कनेक्टिंग स्वयंसेवी संस्थेचे वीरेन रजपूत यांनी दिली. हेल्पलाइन क्रमांक : अनिल गुंजाळ ९४०४२३५१४५, विरेन कनेक्टिंग एनजीओ १८००२०९४३५३
एका माणसाचा फोन आला आणि तू नापास झाला आहेस, पास करायचे असेल तर १३ हजार रुपये भर, असे कुणीतरी एका नाशिकच्या मुलाला सांगितले. खरेच असे असते का? असा भाबडा प्रश्न त्या मुलाने केला... तर दहावीमध्ये ९१ टक्के पडले होते आणि आता बारावीत ५0 टक्के पडले असा एकजण सांगत होता... वाशिम, यवतमाळपासून अनेक भागांमधील मुला-मुलींनी फोन करून आपली भावना व्यक्त केली. नापास झालात किंवा कमी गुण पडले तरी निराश होण्याची आवश्यकता नाही, हीच नवी संधी आहे असे समजा अशा माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करीत असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सहसचिव व समुपदेशक अनिल गुंजाळ यांनी सांगितले.