कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:09+5:302021-04-05T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनानेही आता पुढाकार घेतला आहे. मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याबरोबर मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर यासारख्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.
रविवारी सकाळीच बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी मार्केट यार्डातील बाजार आवाराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी करोना प्रतिबंधाबाबत काय उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतची माहिती दिली़ यावेळी सहायक सचिव बाळासाहेब गायकवाड, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, फळबाजार विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे आदी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाबाबत व्यापारी तसेच कामगारांची बैठक घेतली आहे. बाजार बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांचा विरोध आहे. व्यापाऱ्यांनी कडक निर्बंध लावा, पण बाजार बंद करू नका अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. तसेच पुणेकरांना भाजीपाला वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी मार्केट यार्डातील भाजीपाल तसेच फळ विभाग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या नियमांची सक्ती केल्याची माहिती गरड यांनी दिली. याबाबतच्या नियमांचे कडक पालन करावे अन्यथा जे पालन करणार नाहीत त्यांना दंडही आकारला जाणार असल्याचेही स्पष्ट केले.
---
सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी तसेच बाजार आवारात आंबा खरेदीसाठी होणारी गर्दी, वाहतूककोंडी टाळण्यासाठी गेट क्रमांक चारजवळ आंबा व्यापारासाठी शेड उभारले आहे. त्यामुळे विक्रेत्यांची त्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. परिणामी वाहतूककोंडी व गर्दीही टाळण्यास मदत होणार आहे़
- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती