नीरा येथील मार्केट कमिटी बनली तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:59+5:302021-03-23T04:11:59+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार मोठे असून येथे पोस्ट कार्यालय, गोडावून, पतसंस्था, विविध सोसायटींचे कार्यालये, संगणक सेंटर आदी आस्थापना ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार मोठे असून येथे पोस्ट कार्यालय, गोडावून, पतसंस्था, विविध सोसायटींचे कार्यालये, संगणक सेंटर आदी आस्थापना आहेत. मात्र, येथील परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सायंकाळी मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दारूच्या बाटल्या, शीतपेये घेऊन सार्वजनिक दुकाने, सरकारी कार्यालयांच्या आवारात मद्यपान करण्याचे प्रमाण या परिसरात वाढले आहे. येथील पोस्ट ऑफिसच्या आवारात देखील मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. येथील परिसरातील गोडाऊनच्या तसेच सरकारी कार्यालयांच्या बाजूने संपलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. त्यामुळे यावर कारवाई होणार का, याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष होते.
दरम्यान, समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी याकडे लक्ष देत मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली. जगताप यांनी घेतलेल्या या निर्णयाने भविष्यात कृषी उत्पन्न समिती मद्यपींच्या गोंधळातून मुक्त होऊ शकते, मात्र त्यासाठी पोलिसांच्या कारवाईत सातत्य राहणे गरजेचे आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी येथील नंदन पाईप्सच्या आवारात बसलेल्या मद्यपींना धडक कारवाई करत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत ताब्यात घेतले. नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार राजेंद्र भापकर, होमगार्ड किरण शिंदे, प्रसाद तारू, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर यांनी कारवाई केली.