बाजार स्थलांतरित, पण...
By admin | Published: April 8, 2016 12:49 AM2016-04-08T00:49:24+5:302016-04-08T00:49:24+5:30
पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोरेगाव भीमा येथील एसटी महामंडळाच्या जागेवरील बाजर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थलांतरित करण्यात आला.
कोरेगाव भीमा : पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोरेगाव भीमा येथील एसटी महामंडळाच्या जागेवरील बाजर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थलांतरित करण्यात आला. मात्र, विक्रेते ग्रामपंचायतीशेजारील जागेत न जाता महामार्गावर रस्त्याच्या कडेला बसल्याने पुन्हा एकदा वाहतूक जाम झाली. त्यामुळे येथे वाहतूककोंडी सुटण्याऐवजी कोंडीत भर पडल्याने नागरिक हैराण झाले.
पुणे-नगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा, सणसावाडी, शिक्रापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. वाघोली येथे तर वाहतूककोंडी नित्याचीच असते. सायंकाळी कारखान्याचे कामगार सुटल्यानंतर तर वाघोलीत दोन कि.मी. जाण्यासाठी वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तास लागतो. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था केली असून, अद्याप ते सुस्थितीत चालत नसल्याने वाहतूककोंडी सोडविण्यास अडथळे येत आहेत. अशीच काहिशी स्थिती शिक्रापूरमध्येही आहे. या ठिकाणी बेशिस्तपणे थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडी रोजच पाहण्यास मिळत आहे. कोरेगाव भीमा येथे सायंकाळी बेशिस्त पार्किंगमुळे व शासकीय कार्यालयांच्या अहवालानुसार आठवडेबाजारमुळे वाहतूककोंडी होत आहे. याबाबत डेक्कन चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या कारखान्यांच्या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना कोंडी सोडविण्यासाठी सूचना केल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव स्वत: लक्ष घालून येथील कोंडी सोडविण्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतात.
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार कोरेगाव भीमाचा आठवडेबाजार स्माशनभूमी परिसरात स्थलांतरित करा; अन्यथा बाजार परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रांताधिकारी सोनप्पा यमगर, तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ आदींनी ग्रामपंचायतीला बाजार स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही झाली आहे. एसटी महामंडळानेही त्यांच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, याबाबतचे फलक लावले आहेत. महामंडळाच्या जागेत व रस्त्याच्या कडेला बाजार बसवण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.