लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठ सजली
By Admin | Published: November 11, 2015 01:53 AM2015-11-11T01:53:38+5:302015-11-11T01:53:38+5:30
लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली असून मंगळवारी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. मंडई परिसर, फडके हौद, शनिवारवाडा परिसरासह सर्व बाजारपेठांत ग्राहकांची झुंबड उडाली होती.
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली असून मंगळवारी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. मंडई परिसर, फडके हौद, शनिवारवाडा परिसरासह सर्व बाजारपेठांत ग्राहकांची झुंबड उडाली होती.
लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बहुतांश नागरिक आपल्या घराजवळच खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याने शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये ठिकठिकाणी लक्ष्मीपूजनाचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती. लक्ष्मीपूजनासाठी महत्वाची असणारी केरसुणी, लक्ष्मीच्या छोट्या मूर्तीपासून ते झेंडूचे ढिगच्या ढिग रस्त्यावर विक्रीसाठी दिसत होते. विविध प्रकारच्या पणत्या, उटणे, फुले, ऊस, आकाशकंदील, लाह्या-बत्ताशे, फळे, फटाके असे अनेक स्टॉल शहरात दिसून येत होते. त्यामुळे रस्त्यांना बाजाराचे स्वरुप आले होते. अत्तर, अगरबत्ती, रांगोळी, तसेच रांगोळीचे छाप अशा अनेक वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके वाजले जातात. त्यामुळे फटाके विक्रीच्या स्टॉलवरही आज गर्दी झाली होती. फटाक्यांच्या दरात गेल्या वर्षीपेक्षा २० ते २५ टक्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सर्वाधिक मागणी लहान मुलांच्या आवडीच्या फुलबाजा, भुईनुळे, भुईचक्राला होती. (प्रतिनिधी)