मिठाईसह शहरातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत राहणार बंद : व्यापारी महासंघाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:36 PM2020-03-19T19:36:02+5:302020-03-19T19:54:11+5:30

पुढील आदेशापर्यंत बंद कायम ठेवणार

Market with sweets will remain closed till 31 March | मिठाईसह शहरातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत राहणार बंद : व्यापारी महासंघाचा निर्णय

मिठाईसह शहरातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत राहणार बंद : व्यापारी महासंघाचा निर्णय

Next
ठळक मुद्देमहासंघाशी सराफ, कपडे, इलेक्ट्रॉनिक, टिंबर मार्केट अशा विविध ८२ संघटना सहभागी केवळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे विभाग सुरू राहणार असल्याची माहिती

पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत गुरुवारी (दि. १९) घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे निर्बंध वाढविल्यास तिथपर्यंत बंद कायम ठेवण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले. मिठाई आणि फरसाण संघटनादेखील गुरुवारी (दि. १९) दुपारपासून बंदमध्ये सहभागी झाली. 
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारपासून (दि. १६) तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. पाठोपाठ मंगळवारपासून व्यापारी महासंघ बंदमधे सहभागा झाला. महासंघाशी सराफ, कपडे, इलेक्ट्रॉनिक, टिंबर मार्केट अशा विविध ८२ संघटना सहभागी आहेत. महासंघाने गुरुवारी संपाबाबत आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळिया, रतन किराड, राजेश शहा, अभय गाडगीळ यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली.
या भेटीनंतर महासंघाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील आदेशापर्यंत दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी ३१ मार्चपर्यंत निर्बंध घातले आहेत. त्यात प्रशासनाने वाढ केल्यास त्या दिवसापर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील, असे महासंघाने स्पष्ट केले. 
दरम्यान, मिठाई आणि फरसाण असोसिएशनने देखील प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी (दि. २१) संघटना आढावा घेईल. सध्याच्या स्थितीत सुधारण न झाल्यास बंद पुढे सुरू ठेवण्यात येईल. केवळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे विभाग सुरू राहणार असल्याची माहिती श्रीकृष्ण चितळे यांनी दिली. 
०००
जीएसटीची मुदत वाढवावी 
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्याची मुदत २० मार्च असून, रिटर्न (परतावा) दाखल करण्याची मुदत १० एप्रिल २०२० आहे. बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत; त्यामुळे करभरणा आणि रिटर्न भरणे शक्य नाही. त्यामुळे करभरणा आणि रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढविण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. केंद्र सरकारला तशी शिफारस करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली. 
०००
गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकणार 
सराफ, इलेक्ट्रॉनिक, कापड, वाहन उद्योगासाठी गुढी पाडवा सण महत्त्वाचा असतो. कोरोनामुळे सर्वच बाजारपेठा बंद असल्याने यंदा खरेदीचा मुहूर्त टळणार आहे. 

Web Title: Market with sweets will remain closed till 31 March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.