शहरात उदंड झालेल्या आठवडे बाजारांना चाप लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:25+5:302021-03-05T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शेतकरी आठवडे बाजार’च्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर विविध व्यावसायांचाच बाजार भरला जात आहे. उदंड झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘शेतकरी आठवडे बाजार’च्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर विविध व्यावसायांचाच बाजार भरला जात आहे. उदंड झालेल्या अशा आठवडे बाजारांना चाप लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापुढे कृषी व पणन मंडळाच्या मान्यतेशिवाय व महापालिकेने ठरवून दिलेल्या जागांव्यतिरिक्तच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारांवर कारवाई होणार आहे़
‘शेतकरी ते ग्राहक’थेट शेतमाल विक्रीकरीता उदयास आलेल्या ‘शेतकरी आठवडे बाजार’ ही संकल्पना बाजूला सरली असून येथे इतर व्यापारीच आपले व्यवसाय थाटत आहेत. आजमितीला शहरात जागोजागी भरणाऱ्या आठवडे बाजारात शेतमाल विक्रीच्या नावाखाली कपडे, भांडी, गृहपयोगी साहित्य आदींची रेलचेल अधिक असते. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाहतूककोंडीच्या समस्या सातत्याने उद्भवत आहे़
या पार्श्वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी आठवडे बाजार आयोजित करणाऱ्या काही संस्था, कृषी व पणन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ यावेळी महापालिकेने यापुढे खासगी संस्थांना आठवडे बाजारकरीता थेट परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे़
१५० शाळांची मैदाने व २७ मंडईच्या जागेबाबतचा प्रस्ताव
महापालिकेने अॅमिनेटी स्पेस आठवडे बाजारांसाठी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने न स्वीकारता, त्याऐवजी कृषी व पणन विभागाला महापालिकेच्या १५० शाळांची मैदाने व शहरातील २७ मंडईच्या जागा देण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे या ठिकाणी आठवडे बाजार झाल्यावर त्या रात्रीच स्वच्छता केली जाईल. तसे न झाल्यास दुसऱ्या दिवशी संबंधित शाळा अथवा मंडईकडून याबाबत महापालिकेकडे तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे़
अतिक्रमण विभागाकडून थेट कारवाई
दरम्यान यापुढे आठवडे बाजारासाठी दिलेल्या जागेव्यतिरिक्त रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहितीही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली़