पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या विवाहितेचा रेबीजने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:51 PM2019-11-26T14:51:29+5:302019-11-26T15:08:41+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी,नागरिकांसह १९ जणांना घेतला होता चावा
बारामती : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या विवाहितेचे सोमवारी(दि २५) सकाळी रेबीज ने मृत्यु झाला. या विवाहितेवर ससुन रुग्णालयात उपचार सुरु होते. रेबीजची बाधा झाल्याने खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याने या विवाहितेवर ससुनमध्ये उपचार सुरु होते.मात्र,या उपचाराला यश आले नाही.
दिपाली धनंजय जाधव (वय २७) असे या विवाहितेचे नाव आहे. त्या शहरातील देवतानगर परिसरात वास्तव्यास आहेत. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्या पतीसमवेत दुचाकीवर निघाल्या होत्या.यावेळी अचानक पाठीमागुन आलेल्या कुत्र्याने दिपाली यांना हाताला चावा घेतला. दिवाळीनंतर सुरु झालेल्या शाळेचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी,नागरिकांसह १९ जणांना चावा घेतला होता.
याच दिवशी दिपाली यांना देखील चावा घेतला होता.यानंतर त्यांनी उपचारापोटी त्यांनी दहा इंजेक्शन घेतली होती.मात्र, ते उपचार परीणामकारक ठरु शकले नाहित. काही दिवसांपुर्वी दिपाली यांना अचानक अस्वस्थ वाटु लागल्याने बारामती शहरातील खागसी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र,येथील खासगी डॉक्टरांनी दिपाली यांना तातडीने पुण्यात उपचारासाठी हलविण्यास सांगितले.त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी(दि २४) पुणे शहरातील रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.मात्र,खासगी रुग्णालयात उपचार होणार नसल्याने त्यांना ससुनमध्ये नेण्याचा सल्ला पुण्यातील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला.त्याच दिवशी ससुन रुग्णालयात त्यांना दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले.मात्र,रेबीजचा आजार बळावल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दिपाली यांचा सोमवारी सकाळी दुर्देवी मृत्यु झाला.त्यांच्या मागे पती धनंजय तसेच अडीच वर्षांची मुलगी आहे. कालच रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
———————————————
...चिमुकली तिच्या आईला
अजाणत्या वयात मुकली नसती
दरम्यान,बारामतीमध्ये अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कायम आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगर पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही कुत्री झुंडीने फिरतात. धष्टपुष्ट कुत्री पसरलेली असतात.या बाबत बारामतीकरांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरीषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम देखील हाती घेतली आहे.हि मोहिम वेळीच हाती घेतली असती तर,एक चिमुकली तिच्या आईला अजाणत्या वयात मुकली नसती.
—————————————————
...अन्यथा रुग्णाचा जीव धोक्यात
येण्याची भीती आहे
याबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ सदानंद काळे यांनी सांगितले की,पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यु झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. पिसाळलेले कुत्र चावल्याच्या पहिल्या दिवसापासुन दिलेल्या तारखांनुसार इंजेक्शन घेणे बंधनकारक आहे.तरच रेबीजपासुन सुटका मिळणे शक्य आहे. 0,३,७,१५,२८ तसेच ९० अशा क्रमनिहाय दिवसांनी रेबीजवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन घेणे महत्वाचे आहे.शेवटचे इंजेक्शन या क्रमानुसार कुत्रे चावल्यापासुन ९० व्या दिवशी घ्यावयाचे आहे.वेळच्या वेळी इंजेक्शन घेणे महत्वाचे आहे.अन्यथा रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भीती आहे.