अल्पवयीन सख्या बहिणींचा विवाह रोखला, ‘संगीत शारदा’चा अंक सुरु होण्यापूर्वीच पडला पडदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 06:42 AM2019-03-24T06:42:22+5:302019-03-24T06:42:42+5:30
आजच्या जमान्यातील संगीत शारदाचा अंक प्रत्यक्षात येऊ घातला होता. पण, याची कुणकुण डेक्कन पोलिसांना लागली. त्यांनी दक्षता घेत मुलींना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला.
पुणे : घरची गरीबी, आई मोलमजुरीचे काम करते तर वडील नेहमीच्या दारुच्या नशेत असे असतानाही या दोन्ही सख्या बहिणी हुशार, त्यांना शिक्षणाची आस दहावीच्या चाचणी परिक्षेत त्यांना ८० -८५ टक्के गुण मिळालेले, तरीही त्यांचे आईवडिल त्यांचे गावाकडे त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या तरुणाची लग्न लावून देत होते. आजच्या जमान्यातील संगीत शारदाचा अंक प्रत्यक्षात येऊ घातला होता. पण, याची कुणकुण डेक्कन पोलिसांना लागली. त्यांनी दक्षता घेत मुलींना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला.
शतकापूर्वी संगीत रंगभूमीवर संगीत शारदा हे नाटक खूप गाजले होते़ त्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह जख्खड म्हातायाशी लावून दिले जाते. आजच्या काळात अल्पवयीन मुलींचा विवाह त्यांच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या तरुणांशी लावण्याचा प्रयत्न होत होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डेक्कन भागातील एका शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींचा दहावीचा पेपर संपल्यानंतर त्यांना कर्नाटकातील गुलबर्गा येथे घेऊन जाऊन त्यांचे लग्न लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस शिपाई माधुरी कुंभार, स्वाती जगताप व अभिजित चव्हाण यांना शाळेत जाऊन चौकशी करायला सांगितले. शुक्रवारी २२ मार्चला दहावीचा शेवटचा पेपर होता. पेपर संपण्यापूर्वीच पोलीस या शाळेत गेले. त्यांनी या दोघा मुलींची भेट घेतली. त्यांना दिलासा देऊन आश्वस्त केले. तेव्हा त्यांनी आपल्यावर येऊ घातलेल्या लग्नाची माहिती दिली.
या दोघी मुली १५ व १६ वर्षाच्या आहेत. त्यांची आई धुणेभांड्याचे काम करते. वडिल नेहमीच दारूच्या नशेत असतात. दोघी सख्या बहिणींना शिक्षणात चांगली गती असून त्यांना पुढे शिकण्याची इच्छा आहे. दहावीच्या चाचणी परिक्षेत त्यांना ८० व ८५ टक्के गुण मिळाले आहेत. असे असताना परिक्षा संपल्यावर त्यांचे आईवडिल कर्नाटकातील गुलबर्गा येथे गावी घेऊन जाऊन त्यांचे लग्न लावणार होते. त्यांचे नियोजित वर हे त्यांच्यापेक्षा वयाने खूपच मोठे होते. एकाचे वय ३० तर दुसऱ्या २५ वर्ष आहे. या मुलींची आई ज्या ठिकाणी धुण्याभांड्याची कामे करायला जाते. त्यांच्याकडे या मुली एकदा गेल्या होत्या. त्यांनी ही हकिकत त्यांना सांगितले. कोवळ्या मुलींवर होत असलेला अन्याय त्या माऊलीला पाहविला गेला नाही. त्यांनी याची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनीही वेळेवर मदतीला धाव घेऊन दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.
त्यांचे म्हणणे नोंदवून घेऊन त्यांना बाल न्यायालय समितीसमोर हजर केले. समितीने या मुलींना संरक्षण मिळावे, यासाठी महिलांना सहाय्य करणाऱ्या संस्थेत दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार या दोघींना संस्थेत दाखल करण्यात आले आहे. त्यांना सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगता येईल़ शिक्षण घेता येणार आहे.