हुंड्यासाठी छळातून विवाहितेची आत्महत्या
By admin | Published: July 1, 2017 07:56 AM2017-07-01T07:56:13+5:302017-07-01T07:56:13+5:30
माहेरच्यांनी लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, चारचाकी गाडी दिली नाही, एक लाख रुपयेच केवळ दिले असे वारंवार हिणवत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माहेरच्यांनी लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, चारचाकी गाडी दिली नाही, एक लाख रुपयेच केवळ दिले असे वारंवार हिणवत सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नवरा, सासू आणि सासऱ्याविरूद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती महेश कुंडलिक डांगे (रा. नांदे ता. मुळशी), सासू कल्पना कुंडलिक डांगे आणि सासरे कुंडलिक डांगे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. विवाहितेचे वडील गिरीश नामदेव काटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा महेश डांगे याच्याशी ३० डिसेंबर २०१२मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतरही ती एका संस्थेत रात्रपाळीत एमबीएचे शिक्षण घेत होती आणि दिवसा नोकरी करीत होती. एक वर्षांनंतर सासरच्या मंडळींनी मध्यस्थामार्फत लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही असे कळविले, तिच्या माहेरच्यांनी त्यांची जाऊन समजूत घातली. जुलै- आॅगस्ट २०१५ मध्ये ती सहा महिन्यांची गरोदर असताना नवऱ्याने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तिला १६ जानेवारी २०१६ ला मुलगी झाली, या कारणासह तुझ्या माहेरच्या मंडळींनी चारचाकी गाडी दिली नाही ती आणल्याशिवाय नांदायला येऊ नकोस असे ते तिला सारखे म्हणायचे. बंगल्याच्या कामासाठी घरून तीन लाख रूपये घेऊन ये असे सांगून परत माहेरी धाडण्यात आले. तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांना १ लाख रुपये दिलेही, तरीही त्यांचे समाधान झाले नाही. अचानक २७ जूनला सायंकाळी पाच वाजता ती घरात पडली आहे असा दूरध्वनी सासरच्यांनी तिच्या आईवडिलांना केला. मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली.