तीन लग्ने केली, तीनही बायका सोडून गेल्या; नैराश्य आल्याने तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:13 PM2022-12-01T14:13:11+5:302022-12-01T14:21:53+5:30
याअगोदर त्याने दोन - तीन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला होता...
अवसरी बुद्रुक (पुणे) : दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय तरुणाने पहाडदरा गावच्या हद्दीत झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीड महिन्यानंतर त्याचा मृतदेह पहाडदरा गावच्या हद्दीत जंगलात सापडला असून, त्याच्या खिशात असलेले आधारकार्ड व पॅनकार्डवरून सदर तरुण शेखर शांताराम पवार (वय २८, रा. वाफगाव मांदळेवाडी, ता. खेड) असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत शांताराम गेणू पवार यांनी पारगाव पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की शेखर याची तीन लग्न झाली असून, त्याच्या तीनही बायका सोडून गेल्या आहेत. पत्नी सोडून गेल्यापासून तो नैराश्यामध्ये होता. डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागत होता. याअगोदरही त्यांनी दोन - तीन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. नैराश्य आल्याने दोरी घेऊन तो घराबाहेर पडला होता.
याबाबत खेड पोलिस ठाण्यात शेखर शांताराम पवार हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान दीड महिन्यानंतर दि. २९ रोजी पहाडदरा गावच्या हद्दीत जंगलात त्याचा झाडाला गळफास घेतल्याचा सांगाडा सापडल्याचे पोलिस पाटील माऊली कराळे यांनी शांताराम पवार यांना कळवले. पवार यांनी घटनास्थळी जाऊन, बॉडी व खिशातील कागदपत्रे पाहून आत्महत्या केलेला मुलगा त्यांचा मुलगा शेखर पवार असल्याची खात्री केली आहे.
शेखर याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याबाबत पारगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कालेकर करत आहेत.