टेस्ट ट्यूब बेबीसाठी पाच लाख वडिलांकडून आणण्यास सांगून विवाहितेचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 01:03 PM2019-09-27T13:03:44+5:302019-09-27T13:05:21+5:30
टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपयांची मागणी करून महिलेच्या पतीने पैशांसाठी तगादा लावला...
पिंपरी : मूलबाळ होत नसल्याने टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊ ये, असा महिलेकडे तगादा लावला. तसेच शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पहिली पत्नी हयात असताना आरोपी पतीने दुसरे लग्न केले. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१८ दरम्यान महिलेचा छळ करण्याचा हा प्रकार घडला. याप्रकरणी लातूर येथील सासरच्या मंडळींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेचा पती, सासू, सासरे, दिर, नणंद, नंदवा यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी महिलेचा पती, सासू, सासरे व दिर लातूर येथे राहतात. फियार्दी त्यांच्याकडे नांदत असताना त्यांनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पोटभर जेवण न देता छळ केला. टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपयांची मागणी करून महिलेच्या पतीने पैशांसाठी तगादा लावला. महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी महिला हयात असताना तिच्या संमतीशिवाय आरोपी पती याने दुसरे लग्न केले. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलीस तपास करीत आहेत.