Pune: अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात, दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने भांडाफोड
By नितीश गोवंडे | Updated: December 30, 2023 15:23 IST2023-12-30T15:22:29+5:302023-12-30T15:23:26+5:30
नातेवाईकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune: अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात, दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने भांडाफोड
पुणे : अल्पवयीन युवतीशी लग्न करून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तिला दीड वर्षांचा मुलगा असून ती दुसऱ्यांदा १४ आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १७ वर्ष ११ महिने वयाच्या पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नवऱ्यासह अन्य चार नातेवाईकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी सध्या १७ वर्ष ११ महिन्यांची आहे. तिचे हिरामण गवळीवाडा, येरवडा येथील ३३ वर्षीय तरुणासोबत लग्न लावण्यात आले. यानंतर आरोपी पती रुपेश कांबळे (३३) याला संबंधित युवती ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील देखील, त्याने जबरदस्तीने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तीला एक दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. यानंतर संबंधीत युवती पुन्हा १४ आठवड्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
यानंतर अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पती रुपेश, मावस बहीण जया गायकवाड (४०), सासू रंजना कांबळे, दीर जितेश कांबळे आणि नणंद सोमी खुपटे यांच्याविरोधात पोक्सो सह बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी या करत आहेत.