पालिकेच्या सभांना मार्शल लावणार शिस्त
By admin | Published: October 22, 2015 03:01 AM2015-10-22T03:01:35+5:302015-10-22T03:01:35+5:30
राजदंड पळवणे, तो लपवून ठेवणे, आसन सोडून गोंधळ घालणे, घोषणा देणे, वेळप्रसंगी कागदपत्रे फेकून मारणे आदी प्रकार महापालिकेच्या सभागृहात वाढत चालले आहेत.
पुणे: राजदंड पळवणे, तो लपवून ठेवणे, आसन सोडून गोंधळ घालणे, घोषणा देणे, वेळप्रसंगी कागदपत्रे फेकून मारणे आदी प्रकार महापालिकेच्या सभागृहात वाढत चालले आहेत. अशी दांडगाई करणाऱ्या नगरसेवकांना चाप बसावा यासाठी विधानसभेच्या धर्तीवर मार्शल नियुक्त करण्याची परवानगी महापालिकांना द्यावी, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे सरकारकडे करणार आहे.
पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी महापौरांसमोरचा राजदंड पळवून नेला व लपवून ठेवला. मनसेच्याच एका महिला सदस्याने राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्याबरोबर सभागृहातच असभ्य शब्दात वाद घातला. त्यापूर्वी सेनेच्या एका सदस्याने पिठासीन अधिकाऱ्यांवर कुंडी उगारली होती. महापौरांसमोरील मोकळ्या जागेत जमा होणे, घोषणा देणे, कामकाज बंद पाडणे असे प्रकार तर कायमच होऊ लागलेत. त्यामुळेच सरकारकडे ही मागणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पालिका सभांच्या सध्याच्या नियमावलीत कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर जा, असे सांगण्याचा अधिकार सभापतींना दिला आहे, मात्र त्या सदस्यांनी ऐकले नाही तर काय करावे, याचा उल्लेख नाही. त्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर सभागृहातील शिस्तीसाठी मार्शल नियुक्त करण्याचा अधिकार पालिकांना दिला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. (प्रतिनिधी)