हुतात्मा राजगुरु वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार : सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 09:24 PM2023-07-01T21:24:16+5:302023-07-01T21:25:02+5:30
स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली....
राजगुरुनगर (पुणे) : दोन वर्षात राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाची बांधणी आराखड्यानुसार करण्यासाठी विशिष्ट योजना व यंत्रणा करत वेगाने काम करण्याचा आमचा संकल्प आहे. हुतात्मा राजगुरु राष्ट्रीय जन्मस्थळी देखणे स्मारक बांधण्यात येईल. स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.
हुतात्मा राजगुरु राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारक बांधकामाबाबत शनिवारी (दि. १) रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर शासनाने गठित केलेल्या समितीच्या सदस्यांची व हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे सदस्य व राजगुरुनगर नागरिकांची बैठक घेतली. या बैठकीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, पुण्याचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, हुतात्मा राजगुरु यांचे पुतणे सत्यशील राजगुरु, पुरातत्व विभागाचे विलास वहाणे, प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, शासनाच्या स्मारक समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, शांताराम भोसले, मधुकर गिलबिले, सुशील मांजरे यांच्यासह समितीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, सांस्कृतिक विभाग, पुरातत्व विभाग आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नियोजित स्मारकाचा आराखडा तयार झाला आहे. त्यादृष्टीने कामासाठी जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील पहिला टप्पा म्हणून दीडशे कोटी रुपये मंजूर केले जातील. स्मारकासाठी निधीची कधीही कमतरता पडू देणार नाही. सात दिवसांच्या आत पालक मंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर केला जाईल. त्यांची या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर एचपीसी समोर हा आराखडा सादर केला जाईल. वेगाने यासाठी मान्यता मिळवली जाईल. यावेळी आढळराव पाटील, आमदार मोहिते पाटील, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, प्रिया पवार, मधुकर गिलबिले, राहुल वाडेकर आदींनी सूचना मांडल्या. मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत दिली.