शिक्षणासाठी घराचा त्याग अन् भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मा राजगुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:45 AM2023-03-23T11:45:39+5:302023-03-23T11:46:40+5:30
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व या मातीमध्ये अर्पण केलं, त्यापैकीच एक विशेष नाव म्हणजे हुतात्मा राजगुरू
सत्यशील राजगुरू
राजगुरूनगर: ‘तुम्ही किती जगलात याला महत्त्व नाही, तर कसे जगलात यालाच महत्त्व आहे,’ ही उक्ती क्रांतिकारक राजगुरू यांना लागू पडते. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी हुतात्मा राजगुरू बलिदान दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व या मातीमध्ये अर्पण केलं, त्यातीलच एक विशेष नाव म्हणजे हुतात्मा राजगुरू होय.
राजगुरू हे अत्यंत हुशार होते. मात्र, स्वभावाने खूप तापट होते. त्यांनी शिक्षणासाठी घराचा त्याग केला. भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. राजगुरू त्यांच्यात सामील झाले. परंतु, आपापसांतील फितुरीमुळे त्यांना अटक झाली. तसेच २३ मार्च १९३९ रोजी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी ते फासावर गेले. त्यांचे ‘खेड’ हे गाव आज ‘राजगुरूनगर’ म्हणून ओळखले जाते.
क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू यांचे पूर्वीचे आडनाव ब्रम्हे होते. मात्र, त्यांचे मूळ व कुळ पुरूष जेथून आडनाव राजगुरू झाले ते योगी पुरूष कचेश्वर ब्रम्हे हे शाहू महाराजांचे गुरू झाल्यानंतर त्यांचे आडनाव राजगुरू पडले. शाहू महाराजांनी कचेश्वर ब्रम्हे यांना गुरूस्थानी मानून त्यांना खेडच्या भीमा नदी तीरी एक दगडी व सागवान लाकडात भव्य राजवाडा बांधून दिला. राजाचे गुरू म्हणून राजगुरू हे आडनाव तेव्हापासून रूढ झाले.
शिव राम = शिवराम. देवांचे देव महादेव आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा अंश असलेले शिवराम हे शीघ्रकोपी व मर्यादा पुरूष होते. शत्रूवर त्यांनी कधीही डबल वार केलेला नाही. रामसुध्दा एक बाणी होते. अगदी त्याचप्रमाणे शिवराम यांचे क्रांतिकार्य उजवे व मर्यादित. परंतु, उच्च ठरलेले आहे. राजगुरू या नावाने ते इतिहासात अजरामर झाले. मात्र, शिवराम लहान असताना वडिलांच्या पितृछत्रास पोरके झाले नि थोरले बंधू दिनकर यांच्यावर त्यांची तसेच सर्व कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. ती त्यांनी शेवटपर्यंत यशस्वीपणे निभावली. माता पार्वती माई व दिनकर यांनी शिवरामचे शिक्षण व पोषण योग्यरीत्या केले. मात्र, दिनकर यांच्या नवविवाहीत पत्नीपुढे शिवराम यांना दिनकर यांनी इंग्रजी विषयात कमी मार्क पडले म्हणून जाब विचारला असता. तो त्यांना अपमान वाटला व त्यांनी रागात वयाच्या १३व्या वर्षी कायमचे घर सोडले.
पुणे ते नाशिक पायी प्रवास केला. नाशिकवरून विनातिकीट रेल्वेने ते फिरत फिरत काशीला संस्कृत पंडित होण्यासाठी पोहोचले. १९२३मध्ये ते काशी येथील राम घाटावरील श्री वल्लभराम शाळिग्राम सांग्वेद विद्यालयात पोहचले. १९२१मध्ये मेहता कुटुंबीयांनी या संस्थेची स्थापना केली. तेथे अन्नछत्रात दोन वेळचे जेवण करून व पडेल ते काम करून शिक्षण घेतले. १९२८ ऑक्टोबर, ३० रोजी सायमन कमिशन लाहोरला पोहचले होते. लाला लजपतराय यांच्या नेतृत्त्वाखाली त्यास विरोध झाला. त्या आंदोलनात लालाजी ब्रिटिश पोलिस लाठी हल्ल्यात गंभीर जखमी होऊन १७ नोव्हेंबर रोजी ईश्वराला प्रिय झाले. त्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी राजगुरू, भगतसिंग, आझाद व जयगोपल यांची निवड झाली. सुखदेव याचा हा प्लॅन होता. लालाजींच्या मृत्यूला जबाबदार स्कॉट व जे. पी. सॉंडर्सला ठार करण्याचे ठरले.
८ एप्रिल १९२९ रोजी जेव्हा दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्याची व पत्रके वाटून भाषण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली. तेव्हा राजगुरू व भगतसिंग यांची नावे निश्चित झाली. मात्र, तेथे हिंसा न करता बहिऱ्या जगाला जागविण्यासाठी मोठा बॉम्ब ब्लास्ट करायचा होता. राजगुरू यांनी फक्त सॉंडर्स याचा वध केला असे नाही तर एक मुस्लीम अन्यायी ख्वाजा यास ठार मारले. जो हिंदू महिलांचा छळ करीत असे. तर एकजण इंग्रजांचा दलाल होता, त्यासही एकाच गोळीत यमसदनी धाडले.
पहिली फाशी भगतसिंग यांना देणार होते. परंतु, राजगुरू यांच्या आग्रहापुढे इंग्रज मागे सरले. पहिली फाशी मला द्या, नंतर इतरांना द्या. त्यामुळे २३ मार्च १९३१ रोजी तिघांना म्हणजे राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना एकाच दिवशी व वेळी फाशी देण्यात आली. देशासाठी असे बलिदान जगाच्या पाठीवर कोठेच झालेले नाही... म्हणून ते श्रेष्ठ, उच्च प्रतीचे क्रांतिकारक ठरत आहेत...! आज २३ मार्च, राष्ट्रीय शहीद दिवसानिमित्त क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू यांना विनम्र अभिवादन.