सराईत घरफोड्या गुन्हे शाखेकडून जेरबंद
By admin | Published: January 13, 2017 03:28 AM2017-01-13T03:28:08+5:302017-01-13T03:28:08+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सराईत घरफोड्याला जेरबंद केले असून
पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सराईत घरफोड्याला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अंकुश लक्ष्मण लष्करे (वय २९, रा. केडगाव, ता. जि. अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. घरफोडी करणाऱ्या सराइतांबाबत माहिती घेत असताना पोलिसांना लष्करेबाबत माहिती मिळाली होती. तो सध्या अहमदनगरमध्ये वास्तव्यास असून, पुण्यामध्ये घरफोड्या करतो, असे समजताच युनिट चारच्या पथकाने त्याला केडगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये घरफोड्यांची कबुली दिली. निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून पुढील तपास करण्यात आला. त्याने सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, सांगवीच्या हद्दीतील चार, निगडीच्या हद्दीतील तीन आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक, असे एकूण १३ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)
लष्करे हा निगडीमधील ओटा स्किममध्ये राहण्यास होता. परंतु, काही दिवसांपासून तो पत्नी, मुलांसह नगरला गेला आहे. नगरहून रात्रीच्या वेळी पुण्यात येऊन बंद घरांची पाहणी करुन घरफोडी करण्याची त्याची पद्धत आहे. चोरी केल्यावर सकाळीच तो पसार होत असे. चोरी केलेले दागिने सराफांना विकताना तो आपला अपघात झाला होता, त्याच्या उपचारांपोटी झालेल्या कर्जामुळे दागिने विकत असल्याचे कारण द्यायचा. पुणे शहरात त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे तब्बल ५० घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत.