सिंहगड इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मारुती नवले यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:03 PM2018-10-17T23:03:30+5:302018-10-17T23:18:45+5:30
प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या सिंहगड इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी अटक करुन त्याची सायंकाळी येरवडा तुरुंगात रवानगी केली.
पुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या सिंहगड इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी अटक करुन त्याची सायंकाळी येरवडा तुरुंगात रवानगी केली. नवले व प्राप्तीकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांना न्यायालयाने ७ दिवसांची साधी कैद आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा गेल्या आठवड्यात सुनावली होती. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पुणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी नवले यांना अटक करुन त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली.सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांचे वेतन अनेक महिने थकवल्याप्रकरणी पुण्यात अनेक आंदोलने झाली होती. या आंदोलनानंतरही संस्थेने त्याची दखल घेतली नव्हती. अखेर प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्राध्यापकांचे जवळपास १८ कोटी रुपयांचे थकलेले वेतन तीन टप्प्यांत देण्यात यावे, असे न्यायालयाने आदेश दिले होते.
समाजकल्याण विभागाकडून येणे असलेले साधारण ९ कोटी रुपये संस्थेच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जमा झाले. नवले यांची खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली होती. ९ कोटी रुपये काढण्यासाठी न्यायालयाने तोंडी आदेश दिले आहेत, अशा आशयाचे पत्र नवले यांनी बँक आणि प्राप्तिकर खात्याला दिले. त्यानुसार प्राप्तिकर खात्याने पैसे काढण्यास परवानगी दिली. हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नवले आणि प्राप्तिकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाई केली होती. नवले यांच्या विरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने नवले यांच्यासह मोकाशी यांना ७ दिवसांची साधी कैद आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाची आज अंमलबजावणी करीत पोलिसांनी त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात केली.