मसाप ‘परिवर्तन’च्या कोशातच
By admin | Published: March 28, 2017 02:56 AM2017-03-28T02:56:59+5:302017-03-28T02:56:59+5:30
एखाद्या संस्थेच्या निवडणुकांचा निकाल लागला की एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या पॅनलला कोणताच अर्थ उरत नाही.
पुणे : एखाद्या संस्थेच्या निवडणुकांचा निकाल लागला की एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या पॅनलला कोणताच अर्थ उरत नाही. कार्यकारिणीमध्ये निवडून आलेले पदाधिकारी आणि सदस्य आपापसांतील मतभेद विसरून संस्थेच्या हिताचा विचार करतात. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. मसाप अद्याप ‘परिवर्तन’च्या कोशातून बाहेर पडायला तयार नसून, ज्या शाखांकडून परिवर्तन पॅनलला भरघोस मते मिळाली, अशा सातारा, सांगली शाखांना एका पदाधिकाऱ्याकडून झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पॅनलसह मर्जीतील शाखा सदस्यांचीच वर्णी लावली जात असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे.
वर्षभरापूर्वी मसापमध्ये परिवर्तन घडणार? असा नारा देत पदाधिकाऱ्याच्या पॅनलने ‘परिवर्तन’ घडवले खरे; पण परिवर्तन घडविण्याच्या नादात पॅनलच्या मानसिकतेतूनच प्रमुख पदाधिकारी अद्याप बाहेर पडू शकलेला नाही. सर्व कारभाराची समीकरणे या पॅनलभोवतीच फिरत आहेत. पुण्यापेक्षा सातारा, सांगली, सोलापूर आदी भागांतल्या शाखांकडून ‘परिवर्तन’ला भरघोस मते पडल्याने त्या शाखांच्या झोळीत कृतज्ञतेचे दान टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, म्हणूनच मसापची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुण्यात किंवा आसपासच्या परिसरात होत असलेली विभागीय साहित्य संमेलनं, युवा नाट्य संमेलन, समीक्षा संमेलनं पुण्याबाहेर घेण्याची सुज्ञ खेळी खेळण्यात आली असल्याची चर्चा आहे.
यंदाच्या कार्यकारिणीची बैठक महाबळेश्वर (सातारा) येथे घेण्यात आली, समीक्षा संमेलनही साताऱ्यालाच देण्यात आले आहे. तसेच विभागीय साहित्य संमेलन समितीच्या निमंत्रकपदी विनोद कुलकर्णी (सातारा) आणि सहनिमंत्रकपदी पॅनलचे वि. दा. पिंगळे जे सध्या ग्रंथालय विभागाचे कार्यवाह आहेत, त्यांचीच निवड करण्यात आली आहे. हे चित्र पाहता सदस्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. बण्डा जोशी यांनी वार्षिक ग्रंथ पारितोषिक विभागाचा राजीनामा दिला आहे, तो अजूनही स्वीकारला गेला नसला तरी त्यांना पुण्यातील जबाबदारी द्यायची आणि त्या जागी स्वत:च्या मर्जीतील माणूस आणण्याच्या हालचाली पदाधिकाऱ्याने सुरू केल्या आहेत, या पॅनलच्या कोशातून मसाप बाहेर पडणार का? असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
काम करणाऱ्या शाखांना मिळते संधी
मसापतर्फे कोणत्याही विशिष्ट शाखेला झुकते माप दिले गेलेले नाही. सातारा शाखेतर्फे मराठी भाषा पंधरवडा, शेतकऱ्यांसाठी संमेलन असे उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. ज्या शाखा आणि व्यक्ती काम करतात त्यांना संधी दिले जाते, त्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष मसाप
यंदा पंढरपूरमध्ये समीक्षा संमेलन घेण्याची आमची इच्छा होती; मात्र ते आम्हाला मिळाले नाही. पुढच्या वर्षी तुमच्या शाखेला देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.- कैलास शिंदे,
पंढरपूर शाखाध्यक्ष