मास्क तपासणी होणार अधिक कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:20 AM2021-02-18T04:20:54+5:302021-02-18T04:20:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. बुधवारी दिवाळीनंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. बुधवारी दिवाळीनंतर प्रथमच सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक करण्यात आला होता. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू होती. दरम्यान, महापालिकेने मोटारीतून जाणाऱ्यांना मास्कचा वापरावरील बंधन दूर केले. त्याच वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांमधील निष्काळजीपणा वाढत गेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या विनामास्क कारवाईला पोलिसांकडून शिथिलता आल्यासारखे दिसून येत होते.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क आवश्यक वापरावा. विनामास्क फिरणाऱ्यांची तपासणी अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.