Bharat Bandh: 'सत्ताधारी भाजपनं देश विकायला काढला', पिंपरीत कामगारांचं जन आक्रोश आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:37 PM2021-09-27T17:37:38+5:302021-09-27T17:39:38+5:30
शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत अन्यथा अधिक तीव्र आंदोलन आगामी काळात केले जाईल असा इशारा कामगार नेत्यांनी यावेळी दिला आहे
पिंपरी : संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाविकास आघाडी यांच्या वतीने भारत बंद जन आक्रोश आंदोलन केले. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन केले.
''देशामध्ये पाचशेहून जास्त कामगार संघटना आहेत. तसेच अनेक शेतकरी संघटना आहेत. यापैकी एकाही संघटनेची मागणी नसताना केंद्रातील भाजपाच्या सरकारने शेतकरी विरोधी आणि कामगारांविरोधी काळे कायदे कोणत्याही विरोधी पक्षांशी अथवा संघटनांशी चर्चा न करता विधेयकाव्दारे पास केले.
स्वातंत्र्यापुर्वी आणि स्वातंत्र्यानंतर शेकडो कामगार संघटनांनी लढून काही संविधानात्मक अधिकार मिळविले होते. ते हक्क या मोदी - शहा यांच्या सरकारने एका रात्रीत रद्द केले. कामगारांना व कामगार संघटनांना जाचक ठरतील अशा अटी टाकून चार नविन कामगार कायद्यात त्यांचे रुपांतर केले. हे शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत अन्यथा अधिक तीव्र आंदोलन आगामी काळात केले जाईल असा इशारा कामगार नेत्यांनी यावेळी दिला आहे.''
नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात तेच त्यांचे प्रवक्तेही बोलतात - ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर
''ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले, ''एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा पंतप्रधान मोदी - शहा यांचे सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादीत होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे. भाजपाचे प्रवक्ते देखिल बौध्दिक मवाली लोकं सोशल मिडीयात वाटेल ते खोटं बोलतात. वृत्तवाहिनींच्या चर्चांमध्ये देखील धडधडीत खोटं बोलतात. यांचे हे बदमाशीचे खेळ आता नागरिकांच्या लक्षात आले आहेत. नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात तेच त्यांचे प्रवक्ते ही खोटं बोलतात. काँग्रेसच्या काळात काय झालं असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे हे काँग्रेसनेच उभे केलं आहे. आयता मिळालेला देश भाजपाने विकायला काढला आहे असा आरोप अभ्यंकर यांनी यावेळी केलाय.''
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ कामगार नेत्या लता भिसे आणि कामगार उपस्थित होते.