पुण्यात कोर्टाच्या शेजारीच मसाज पार्लर आणि हुक्क्याचा धूर; मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:31 PM2022-06-13T13:31:10+5:302022-06-13T13:33:52+5:30
असा चालतो हुक्का पार्लरचा व्यवसाय...
लष्कर (पुणे) : लष्कर भागातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एमजी रोडवर बाटा चौकातील लष्कर न्यायालयापासून हाकेच्या अंतरावरील १६ एमजी रोड येथील सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हुक्का पार्लर तर चौथ्या मजल्यावर मसाज सेंटरच्या नावावर वेश्या व्यवसाय सुरू असून, याबाबत येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खबरच नसल्याने वसुली पंटरच्या आशीर्वादाने अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावल्याचे चित्र आहे.
एमजी रोड हा पुण्यातील ब्रिटिश काळापासून व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, या रस्त्यावर आजही ऐतिहासिक वास्तू आहेत. येथे खरेदीसाठी पुण्याबाहेरूनही नागरिक येतात. परंतु, येथील लष्कर न्यायालयापासून केवळ १०० मीटर अंतरावर, तर परिमंडळ ४ चे पोलीस उपयुक्त, सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयापासून ३५० मीटरवर असलेल्या पाच मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर दिवसरात्र अवैध हुक्का पार्लर आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असूनही याची कोणालाही माहिती नाही.
याच इमारतीत कोचिंग क्लासेस व राज्य सेवा, केंद्रीय सेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस देखील चालतात. कॅम्प विभागातील या अवैध धंद्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप लष्कर भागातील नागरिक करीत आहेत.
असा चालतो मसाज सेंटर व्यवसाय
डाटा विकणाऱ्या कंपन्यांकडून मसाज सेंटरवाले नागरिकांचे फोन नंबर घेतात. त्यानंतर आपल्याला कमी पैशात म्हणजे दोन हजारांत फुल बॉडी मसाज असा मेसेज येतो. त्यावर फोन केला असता लष्कर कोर्टच्या शेजारी आमचं सेंटर आहे असे सांगितले जाते. ग्राहक तेथे पोहोचल्यानंतर चार-पाच मुली निवडण्यासाठी दिल्या जातात. त्यानंतर या मुली थेट अतिरिक्त सेवेसाठी विचारतात. मग त्याचे दोन ते अडीच हजार वेगळे मोजावे लागतात. अशा प्रकारे एका ग्राहकाकडून साडेचार ते पाच हजार रुपये लुटले जातात.
असा चालतो हुक्का पार्लरचा व्यवसाय
कायद्याने हुक्का पार्लर चालविण्यावर बंदी असूनही कॅम्पमध्ये कराची इमारतीत राजरोसपणे हुक्का सुरू आहे. एका हुक्का पॉटची किंमत ५०० ते ७०० रुपये इतकी आहे. याच इमारतीत कोचिंग क्लासेसही चालविले जातात. येथेच गांजा आणि इतर अमली पदार्थ देखील मिळतात, असे येथे हुक्का पिण्यासाठी येणाऱ्या एका तरुणाने सांगितले.