कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:21 PM2022-11-08T19:21:38+5:302022-11-08T19:23:47+5:30
प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डी-१८ शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या कंपनीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता मोठ्या स्वरुपात असल्याने उंचावर आगीच्या ज्वाला दिसून आल्या तर कंपनीच्या पत्र्याच्या शेडचे देखील नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नसून तीन कामगार जखमी आहेत. त्यांना पाटस येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
शोगन कंपनीमध्ये सुरु असलेल्या रासायनिकप्रक्रीये दरम्यान रिॲक्टर मधील दाब वाढल्याने त्याचा स्फोट झाला. या प्रक्रीये दरम्यान या ठिकाणी कामगार उपस्थित नसल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा स्फोटाची तीव्रता व अपघाताच्या जागेच्या परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होती. काही अंतरावर असणारे उपेंद्र सिसोदिया, हरिकिशन व अन्य एक जण हे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
''आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवून तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तीन कामगार जखमी असल्याचे माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. - किरण पाटील,अधिकारी अग्निशामक दल, कुरकुंभ औद्योगीक क्षेत्र.''
''प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनीक प्रक्रीये दरम्यान दबाव निर्माण होऊन स्पोट झाला आहे.जखमी कामगारांना त्वरित उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले असून घडलेल्या अपघाताची रीतसर माहिती घेतली जाईल.- युवराज घारगे,कंपनी व्यवस्थापक.''